Ambabai (Mahalakshmi) Temple: पार्वती पंचायतननुसार अंबाबाई मंदिराची रचना, मूळ फरशीमुळे गारवा वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:04 PM2022-05-17T12:04:53+5:302022-05-17T12:07:19+5:30
मंदिर आवारातील संगमरवरी फरशी काढल्यानंतर त्याखाली दडलेल्या मूळ दगडी फरशीवर कुठेही कासव नाही.
कोल्हापूर : आदिशक्ती स्वरूप करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची रचना ही पार्वती पंचायतननुसार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंदिर आवारातील संगमरवरी फरशी काढल्यानंतर त्याखाली दडलेल्या मूळ दगडी फरशीवर कुठेही कासव नाही. अंबाबाईच्या मूर्तीसमोर गणपती, वर मातृलिंग, समोर नंदी असे मंदिराचे मुख स्वरूप आहे. कासव चौकाला आता पूर्वीचेच शंखतीर्थ चौक, असे संबोधले जाणार आहे. मूळ फरशीमुळे मंदिरातील गारवा वाढला आहे.
अंबाबाई मंदिराच्या दगडी बांधकामावर व फरशीवर लावण्यात आलेली संगमरवरी फरशी काढण्याचे काम गेल्या १० दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून सुरू आहे. त्यामुळे मूळ दगडी बांधकामाचे सौंदर्य प्रकाशात येत असून सोमवारी गणपती चौकातील सुंदर गोल फरशी दिसू लागली आहे.
मूळ मंदिराच्या बांधकामात कुठेही कासव नाही. तो संगमरवरी फरशीवर बसवण्यात आले असून मूळ मंदिराची रचना पार्वती पंचायतननुसार असल्याचे स्पष्ट झाले. सध्या गरुड मंडपातील फरशी काढण्याचे काम सुरू असून पुढील आठ दिवसात गाभाऱ्यातील फरशीदेखील काढली जाईल. त्यानंतर मुळ फरशीची स्वच्छता, पॉलीश करणे यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. मूळ दगडी फरशीमुळे मंदिरातील आर्द्रता कमी होऊन मंदिरात गारव्याचा अनुभव येत आहे.