Kolhapur: पाचशेच्या बनावट नोटा जमा केलेले खाते नवी मुंबईकराचे, चौकशीसाठी बोलवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 03:09 PM2024-04-04T15:09:24+5:302024-04-04T15:09:48+5:30
सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी
कोल्हापूर : आयसीआयसीआय बँकेच्या राजाराम रोड येथील एटीएम सेंटरमध्ये अज्ञाताने डिपॉझिट मशीनद्वारे ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा भरल्या होत्या. बनावट नोटा जमा केलेले खाते नवी मुंबईतील व्यक्तीचे असून, त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे. एटीएम सेंटरसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली.
राजाराम रोड येथील वसंत प्लाझामध्ये ग्राउंड फ्लोअरला असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या डिपॉझिट मशीनमध्ये २८ मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास एका व्यक्तीने बनावट नोटा जमा केल्या होत्या. हा प्रकार दुसऱ्या दिवशी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यावरून अधिकाऱ्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. बनावट नोटा जमा झालेले खाते नवी मुंबईतील व्यक्तीचे असल्याची माहिती तपासात समोर आली.
त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी संबंधित खातेदाराला चौकशीसाठी बोलवले आहे. दोन दिवसात तो कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, एटीएम सेंटरसह आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पैसे जमा केल्यानंतर संबंधित व्यक्ती कुठे गेली, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. आठवडाभरात या गुन्ह्याचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.
बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय
आजपर्यंत काही व्यक्तींद्वारे बनावट नोटा चलनात आणल्या जात होत्या. आता यासाठी डिपॉझिट मशीनचा वापर झाल्याने बँकांची चिंता वाढली आहे. या घटनेच्या निमित्ताने बनावट नोटा तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्याची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
स्वीकारल्यानंतरच नोटांची ओळख
खराब किंवा जीर्ण झालेल्या नोटा न स्वीकारणारे डिपॉझिट मशीन बनावट नोटा स्वीकारते. त्यानंतर तपासणी होऊन मशीनमधील स्वतंत्र बास्केटमध्ये बनावट नोटा जमा होतात. त्यामुळे स्वीकारण्यापूर्वी बनावट नोटांची ओळख स्पष्ट होत नाही, अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.