महाडिक-सतेज पाटील यांच्यात उचगाव ग्रामपंचायतीच्या निकालावरुन कलगीतुरा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 06:15 PM2022-12-28T18:15:39+5:302022-12-28T18:16:09+5:30
सरपंचपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांचा मोर्चा
कोल्हापूर : उचगाव ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निकालावरून खासदार धनंजय महाडिक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे गट आमने-सामने आले आहेत. सरपंचपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी महाडीक गटाने केल्याने दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील राजकीय वाद नवीन नाही. यापूर्वी पाचगावचा सत्तासंघर्ष उफाळून आला होता. परंतु यावेळची पाचगावची निवडणूक शांततेत झाली. मात्र आता उचगाववरून वाद उफाळला आहे. उचगावमध्ये थेट सरपंचपदासाठी काँग्रेसचे मधुकर चव्हाण व भाजपचे सतीश मर्दाने यांच्यात लढत झाली होती. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी निकाल जाहीर करण्यापूर्वीच मर्दाने समर्थकांनी जल्लोष केला.
संपूर्ण मतमोजणीनंतर चव्हाण यांना ६९ मतांनी विजयी घोषित केले. त्यावर, मर्दाने समर्थकांनी हरकत घेतली. सरपंचपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी, या मागणीसाठी मोर्चा काढत जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग, ग्रामपंचायत आणि गांधीनगर पोलिस ठाण्यात निवेदन दिले. आता यावरून खासदार महाडीक व आमदार पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
..म्हणून आम्ही मोर्चे काढले नाहीत : सतेज पाटील
राजकारणात जय-पराजय होत असतो, आम्ही लोकशाही मानणारे आहोत. गांधीनगर, कंदलगावसह तीन गावांत आमचा सरपंच झाला नाही म्हणून आम्ही तिथे मोर्चे काढले नाहीत, असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
लोकशाहीत परत निवडणुका घ्यायची पद्धत असती तर आम्ही २०१४ ची निवडणूक घ्या म्हटले असते. ईव्हीएममध्ये मतदानाची नोंद होत असते. मतमोजणीवेळी पोलिंग एजंट असतात. संशय घेण्यापेक्षा निकाल मान्य केला पाहिजे, लोकशाहीत हे चालत असतं. पराभव पचविण्याची ताकद पाहिजे.
अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये : धनंजय महाडिक
विधानसभा २०१४ मध्ये पराभव झाल्यानंतर सहा महिने अज्ञातवासात जाणाऱ्यांनी आम्हाला पराभव पचविण्याचे शिकवू नये, असा पलटवार खासदार धनंजय महाडिक यांनी केला.
आम्ही आतापर्यंत अनेक पराभव पचवून शिखरावर पोहोचलो आहोत. उचगावमध्ये मतदान झाल्यानंतर सतेज पाटील यांनी गावात जाऊन अनेक ठिकाणी बैठका घेतल्या होत्या.अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोपदेखील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
त्यामुळे उचगावातील ग्रामस्थांचे केवळ एकच म्हणणं आहे, की मतदानाची फेरमोजणी करावी. आपण ग्रामस्थांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. प्रशासकीय आणि न्यायालयीन पातळीवर गंभीरपणे पाठपुरावा केला जाईल, असे खासदार महाडीक यांनी म्हटले.