चार कोटीहून अधिकची फसवणूक, दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 06:07 PM2021-11-21T18:07:13+5:302021-11-21T18:07:49+5:30
शिरोली : कमी किंमतीत सोने किंवा चार दिवसांत १० टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या हालोंडीच्या (ता.हातकणंगले) ...
शिरोली : कमी किंमतीत सोने किंवा चार दिवसांत १० टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या हालोंडीच्या (ता.हातकणंगले) दत्तात्रय जामदार ऊर्फ डीजेला अखेर अटक करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून दत्तात्रय जामदार ऊर्फ डीजे हा फरार होता. धनादेश बाऊन्स प्रकरणी वडगाव न्यायालयाच्या आदेशानुसार शिरोली पोलिसांनी त्याला अटक केले आहे. त्याने सुमारे चार कोटीहून अधिक फसवणूक केल्याचे तपासात पुढे आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून दत्तात्रय जामदार ऊर्फ डीजे हा देणेकऱ्यांना फसवून हुपरी रेंगाळ परिसरात राहत होता. त्यातच या प्रकरणात तक्रारदार पुढे न आल्याने हा तपास थांबला होता. पण सोने देऊ शकत नसल्याने जामदारने तक्रारदारांना धनादेश देऊन स्वत:वरची कारवाई टाळली होती.
मात्र हालोंडी येथील सुरेश चौगुले व आण्णासाहेब चौगुले यांनी धनादेश वटला नाही म्हणून वडगाव न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने जामदारवर वॉरंट काढले होते. शिरोली पोलिसांनी जामदारला त्याच्या सासरवाडीतून शनिवारी चौकशीला ताब्यात घेतले. आणि रविवारी अटक केली. जामदार याने सुमारे पंधरा ते सतरा जणांना ५ कोटीहून अधिक रुपयांचा गंडा घातला आहे. पैसे आणि सोने दोन्ही पैकी काहीच मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदीन झाले होते. कमी किमतीत सोने खरेदी करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम गोळा केली. गुंतवणूकदारांना जानेवारी २०१९ पासून जामदार टोलवत होता.
यातच सुशिल चौगुले व आण्णाप्पा चौगुले व्यक्तीना जामदार याने धनादेश दिला होता. हा धनादेश वटला नाही.म्हणून चौगुले यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. आणि न्यायालयाने जामदार ऊर्फ डीजे याला अटक करण्याचे आदेश दिले. त्यावरुन शिरोली पोलीसांनी जामदार ऊर्फ डीजे याला हुपरी रेंदाळ येथून अटक केली आहे. याबाबत अधिक तपास सुरू असुन यात अजून कोल्हापूर मधील दोन मोठ्या व्यक्ती सापडणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सांगितले आहे.