खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेप
By admin | Published: October 1, 2015 12:24 AM2015-10-01T00:24:58+5:302015-10-01T00:37:18+5:30
२००८ मधील प्रकरण : जिल्हा न्यायालयाचा निकाल
ओरोस : प्रेम प्रकरणातून मालवण तालुक्यातील देवली माळरानावर सोनम भरत परब हिच्या १९ आॅक्टोबर २००८ रोजी झालेल्या खून प्रकरणी नित्यानंद ऊर्फ पप्पू सत्यवान कदम याला दहा हजार रुपये दंड व जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी सुनावली आहे.मालवण तालुक्यातील कांदळगांव येथील राहणारी सोनम हिच्यावर आचरा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिपाई म्हणून काम करणाऱ्या नित्यानंद ऊर्फ पप्पू सत्यवान कदम याचे प्रेम होते.सोनम ही रेवतळे मालवण येथे नीळकंठ जगन्नाथ कोळंबकर यांच्याकडे कामधंदा करून मालवण स. का. पाटील महाविद्यालयात शिकत होती. नित्यानंद याची आत्या ही सोनमची सख्खी काकी असल्याने त्याचे दररोज जाणे-येणे असायचे. यातून त्याचे एकमेकांवर प्रेम जडले.दरम्यान, नित्यानंद कदम ज्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काम करायचा त्या शाळेतील शिक्षण घेणाऱ्या एका मुलीशी त्याचे प्रेम होते. याबाबतची सविस्तर माहिती या दोन्ही मुलींना समजल्याने नित्यानंदला त्या एकमेकांशी संबंध ठेवू नये, असे सांगायच्या. त्यानंतर नित्यानंदने १९ आॅक्टोबर २००८ रोजी दुपारी अडीच वाजता सोनमला ‘मला आपल्या लग्नाविषयी बोलायचे आहे’, असे सांगून भरडनाका मालवण येथे बोलविले व मोटारसायकलने (एम एच ०७-४११६) तिला देवली माळरानावर निर्जनस्थळी घेऊन गेला व त्याठिकाणी तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला.
याबाबत मालवण पोलिसांत २० आॅक्टोबर २००८ रोजी सोनम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार मालवण पोलीस शोध घेत होते. दरम्यान, २५ नोव्हेंबर २००८ रोजी तब्बल एक महिन्याने देवली माळरानावर मृतदेह असल्याचे वृत्त समजताच पोलिसांनी माहिती घेऊन बेपत्ता सोनम हिच्या वडिलांना घटनास्थळी नेण्यात आले व मृतदेह दाखविण्यात आला असता त्यांना मृतदेहाची ओळख पटल्याने नित्यानंदवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर दोषारोपपत्र सुनावणीमध्ये १९ साक्षीदार तपासण्यात आले. यात पंचांची भूमिका महत्त्वाची ठरली.
शिवाय मुलीचे वडील भरत जगन्नाथ परब, बहीण शीतल तसेच पुरुषोत्तम जगदीश बागकर, भालचंद्र कोळंबकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणातील मृत सोनमने लिहिलेली चिठ्ठी नजीकच्या हॉटेलमधील कामगार पुरुषोत्तम बागकर याने मोटारसायकलवरून जाताना पाहिली होती. तसेच भालचंद्र कोळंबकर याने मालवण भरड नाका येथे समोरच्या एस.टी.डी. बुथवर फोन करून ती परत कोळंबकर याचे एस.टी.डी.वर स्वत: सोनम आली होती व पाणी पिल्याचे सांगितले. या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या होत्या.
या प्रकरणी विविध कलमांखाली जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, सहा महिने शिक्षा व पाच हजार दंड, सहा महिने शिक्षा अशी एकत्रित दहा हजार दंड आणि जन्मठेप शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणी जिल्हा सरकारी अभियोक्ता अमोल सामंत यांनी काम पाहिले. (वार्ताहर)