Kolhapur: सीपीआरमधून पळून जाण्याचा आरोपीचा प्रयत्न; पाठलाग करून पोलिस, सुरक्षारक्षकांनी पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 05:01 PM2024-07-30T17:01:18+5:302024-07-30T17:02:24+5:30
या घटनेने पोलिसांची तारांबळ उडाली
कोल्हापूर : वैद्यकीय तपासणी करून चहासाठी थांबलेल्या एका आरोपीने पोलिसांच्या हाताला हिसडा मारून सीपीआरच्या आवारातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. अखेर त्याला पाठलाग करून पकडल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, एका चाळीस वर्षीय आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणले. तो विनयभंग प्रकरणातील आरोपी आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून झाल्यानंतर त्या आरोपीने चहा प्यायचा आहे, असे पोलिसांना सांगितले. त्यावेळी त्याला घेऊन आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्या बेड्या खोलल्या. सीपीआरच्या आवारातच चहा पिण्याच्या बहाण्याने आरोपी थांबला.
मात्र, त्याने पोलिसांच्या हाताला हिसडा देऊन पळून जाण्याच्या प्रयत्न केला. अचानक झालेल्या प्रकाराने पोलिस भांबावले. त्यांनी सीपीआरच्या सुरक्षारक्षकांना मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यास सांगितले. यावेळी परिसरात बघ्याची मोठी गर्दी झाली होती. दहा ते वीस पावले तो पळून जात असताना त्याला पोलिसांनी झडप घालून त्याला पकडले. घडलेल्या या प्रकाराने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना चांगलाच घाम फुटला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला.
बघ्यांची गर्दी अन पोलिसांची धावपळ
नेहमी गजबजलेल्या सीपीआरमध्ये अचानक आरोपीने पळ काढल्याने मोठी तारांबळ उडाली. पोलिस, सीपीआरचे सुरक्षारक्षक आणि नातेवाइकांनी पाहण्यासाठी आलेल्यांची गर्दी होती. या प्रकाराने आरोपीला पकडेपर्यंत पोलिसांची मोठी दमछाक झाली. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई होणार का, अशी चर्चा उपस्थितांत होती.