‘कमवा आणि शिका’तून दिली उमेद
By Admin | Published: September 22, 2014 01:10 AM2014-09-22T01:10:35+5:302014-09-22T01:10:48+5:30
चाळीस वर्षांपासून सुरुवात : शिवाजी विद्यापीठाची स्वावलंबी योजना
संतोष मिठारी, कोल्हापूर
आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या, सामाजिकदृष्ट्या वंचित असणाऱ्या कुटुंबांमधील अडीच हजार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम शिवाजी विद्यापीठाच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेतून झाले आहे. गेल्या ४० वर्षांपासून कार्यरत असलेल्या या योजनेद्वारे या विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबी शिक्षण आणि श्रमप्रतिष्ठेची मूल्ये रुजविण्यात येत आहेत.
साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेत विसाव्या शतकाच्या मध्यावर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या ‘कमवा आणि शिका’ माध्यमातून स्वावलंबी शिक्षणाचा महत्त्वाचा प्रयोग झाला. शिवाजी विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांसाठी या प्रकारची योजना असावी, अशी मनीषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांची होती. विद्यापीठाच्या स्थापनेवेळी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सोलापूर असे कार्यक्षेत्र होते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही प्रदेशाचा समावेश होता. यातील बहुतांश भाग हा दुष्काळग्रस्त, सामाजिकदृष्ट्या वंचित, निम्न आर्थिकस्तरीय रचना असणारा असा होता. अशा परिस्थितीतील अनेक कुटुंबांतील मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहत होती. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून उच्च शिक्षणाच्या बळावर स्वावलंबी शिक्षणाचे धडे मिळावेत या उद्देशाने विद्यापीठाने १९६८मध्ये ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू केली. सुरुवातीला संबंधित योजनेतील विद्यार्थिसंख्या अवघी २० होती. सध्या दरवर्षी १०० विद्यार्थी आणि ५० विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो. यात पदव्युत्तर अधिविभागातील कला, सामाजिकशास्त्रे, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.