जनतेची निवड योग्य असल्याची पोचपावती : धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:13 AM2019-01-22T01:13:19+5:302019-01-22T01:13:48+5:30
खासदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेने मला निवडले. सलग तिसºयांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाल्याने जनतेची ही निवड योग्य असल्याची पोचपावती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर : खासदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेने मला निवडले. सलग तिसºयांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाल्याने जनतेची ही निवड योग्य असल्याची पोचपावती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.
चेन्नई येथे ‘संसदरत्न’ पुरस्कार स्वीकारून कोल्हापुरात आल्यानंतर महाडिक यांनी आपल्या या भावना ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या. साडेचार वर्षांच्या कामगिरीचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.
दिल्लीतील सुरुवातीचे दिवस सांगताना महाडिक म्हणाले, माझ्यासारख्या युवकावर कोल्हापूरच्या जनतेने विश्वास टाकला; त्यामुळे तो सार्थ करण्याचा निर्धार मी केला होता. देशभरातून येणाºया उच्चशिक्षित आणि अनेक वर्षे संसदेत काम केलेल्या मान्यवरांमध्ये स्वत:ला सिद्ध करणे, हे आव्हानात्मक होते; परंतु ज्या जनतेने मला दिल्लीत पाठविले, त्यांची निवड योग्य होती हे दाखविण्याच्या भूमिकेतून तिसºया दिवशी मी संसदेच्या ग्रंथालयात गेलो. याचे ग्रंथपालांना आश्चर्यही वाटले. यानंतर मी आदर्श संसदपटू राहिलेले मधु दंडवते, अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यपद्धती विषयीची पुस्तके वाचली.
प्रश्न विचारण्याच्या पद्धती, प्रश्नांची मांडणी, त्याच्या उत्तरावर पुन्हा चर्चा, शून्य प्रहरातील प्रश्न, तारांकित, अतारांकित प्रश्न या सगळ्यांची माहिती घेतली. मग राष्ट्रीय प्रश्न, महाराष्ट्राचे प्रश्न आणि कोल्हापूरचे प्रश्न अशी विभागणी करून त्यानुसार नियोजन केले. यासाठी तीनजणांची एक चांगली टीम तयार केली.
जे प्रश्न आम्ही पाठवितो, त्यातून लॉटरी पद्धतीतून प्रश्न निवडले जातात. अधिवेशनाच्या आधी १५ दिवस प्रश्न विचारावे लागतात. २५0 प्रश्न एका अधिवेशनासाठी पाठविले, की त्यातून ३0/४0 प्रश्न अधिवेशनामध्ये लागायचे; पण मला सर्वच प्रश्नांची तयारी करावी लागत असे.या पद्धतीने पहिल्या वर्षी ७५0, दुसºया वर्षी ९00 आणि तिसºया वर्षी ११३६ प्रश्न उपस्थित केले. प्रत्येक बिलावर पक्षाची भूमिका मांडण्याची, देशाच्या अर्थसंकल्पावर, रेल्वे संकल्पावर बोलण्याची संधी नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दिली.
वैभववाडी रेल्वेमार्ग, महिलांच्या रेल्वे डब्यात सीसीटीव्ही लावणे, पुणे कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, कोल्हापूर स्टेशनवरील सुधारणा, विमानसेवा, पासपोर्टची सुविधा आणि बी. एस. एन. एल.चे सर्वाधिक उभारण्यात आलेले १३१ थ्रीजी टॉवर अशी अनेक कामे मार्गी लावली.संसदेत विचारले गेलेले प्रश्न, संसदेतील उपस्थिती, चर्चेत घेतलेला सहभाग या सर्वांचा एक आढावा घेऊन ‘संसदरत्न’ पुरस्कार दिला जातो. सलग तिसºया वर्षी हा पुरस्कार मला मिळाल्याने मी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना आहेच.
रस्ते, गटर्ससाठी निधी एवढेच काम नाही
खासदाराचे काम केवळ रस्ते आणि गटर्ससाठी निधी देणे इतकेच नसून, देशाच्या कारभाराची धोरणे ठरवण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. सर्वसामान्य नागरिकांशी संबंधित आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधा या सर्व बाबतीत खासदाराने कार्यरत राहून त्यांचे जीवनमान कसे उंचावले जाईल, याची काळजी त्याने घ्यावयाची असते. याच भूमिकेतून मी संसदेत कार्यरत आहे.