बदलत्या तंत्रज्ञानाची कौशल्ये आत्मसात करा
By admin | Published: February 11, 2017 12:25 AM2017-02-11T00:25:54+5:302017-02-11T00:25:54+5:30
नानासाहेब पाटील : विवेकानंद महाविद्यालयात विज्ञान दिनानिमित्त व्याख्यान
कोल्हापूर : आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटर, इंटरनेट आॅफ थींग्ज अशा तंत्रज्ञानाने मानवी समाजातील सर्वच क्षेत्रे प्रभावित होत असून रोजगारनिर्मितीत घट होत आहे. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाची कौशल्ये प्रत्येकाने आत्मसात करायला हवीत, असे प्रतिपादन निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी शुक्रवारी केले.
विवेकानंद कॉलेजतर्फे विज्ञान दिनानिमित्त शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे आयोजित व्याख्यानात ‘नवनवीन वैश्विक तंत्रज्ञान आणि मानवी समाजाचे भान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे होते.
पाटील म्हणाले, २००७ साली यू ट्यूबची सुरुवात, अॅँड्रॉईडचा विकास, इंटरनेट वापरकर्त्यांत वाढ, ‘आयबीएम’ने माणसासारख्या वागणाऱ्या रोबोची केलेली निर्मिती यांमुळे हे वर्ष क्रांतिकारी ठरले. त्यानंतर प्रत्येक ठरावीक अंतराने तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत गेले आहेत. प्रत्येक चार वर्षांत नवे तंत्रज्ञान येत आहे. संगणक, सायबर स्पेस तंत्रज्ञानाची ही चौथी औद्योगिक क्रांतीच म्हणावी लागेल. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत संपर्काच्या साधनांमध्येही बदल घडून आले आहेत. रोबोटिकसारख्या तंत्रज्ञानाचा वापर व्यापार, उद्योग, शिक्षणव्यवस्था, घरगुती दैनंदिन कामासह मोठ्या हॉस्पिटलमध्येही होत आहे. मायक्रो फिश रोबो तर अचूक रोगनिदान करण्यासाठीही आता वापरला जात आहे. मानवी प्रयत्नांना शक्य नाही अशा ठिकाणी हे तंत्रज्ञान अचूकपणे व वेगाने काम करते. त्यामुळे मानवापेक्षा जास्त बुद्धिमत्ता असलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्वच क्षेत्रांत प्रभावी ठरत असून, जगभरातील रोजगारांत घट होत आहे. सध्या माहिती संशोधक, यूएक्स डिझायनरला मोठी मागणी आहे. अशा क्षेत्रांची करिअरच्या दृष्टीने निवड करायल्
ाा हवी. प्रा. राजश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. हिंदूराव पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. विठ्ठल पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
नानासाहेब पाटील म्हणाले,
युवा पिढीने उच्च प्रतीचे ध्येय बाळगायला हवे.
प्रत्येक शाळा, महाविद्यालयात ‘टेक्नॉलॉजी स्कूल’ व्हायला हवे.
‘आयबीएम’ने तयार केलेले ‘वॅटसन सॉफ्टवेअर’ हे मानवी प्रगतीचे सर्वांत मोठे प्रतीक आहे.