नवीन कौशल्ये आत्मसात करणे हेच खरे शिक्षण- प्रा. संजय धांडे; शिवाजी विद्यापीठाचा ५९वा दीक्षांत समारंभ उत्साहात
By संदीप आडनाईक | Published: March 30, 2023 12:35 PM2023-03-30T12:35:45+5:302023-03-30T12:38:27+5:30
दोन वर्षांनंतर यंदाचा दीक्षांत सोहळा ऑफलाइन पद्धतीने झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांत कमालीचा उत्साह
कोल्हापूर : विद्यापीठांनी मुक्त बहुशाखीय अभ्यासक्रमांची कास धरावी असा आग्रह धरत कानपूर विद्यापीठाचे माजी संचालक प्रा. संजय धांडे यांनी बुधवारी विद्यार्थ्यांनी ‘लाइफ लाँग लर्नर’ प्रक्रियेत राहत काळानुरूप आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, नवीन कौशल्य आत्मसात करणे, हेच खरे शिक्षण आहे असे आवाहन केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती म्हणून राज्यपाल रमेश बैस ऑनलाइन सहभागी झाले. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित होते. राज्यपाल बैस यांनी विद्यापीठाने संशोधनामध्येही प्रभुत्व मिळवावे असे आवाहन केले.
प्रा. धांडे म्हणाले, बहु विद्याशाखीय अभ्यासक्रम अवलंबित असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या विषय निवडीचे स्वातंत्र्य विद्यापीठांनी द्यायला हवे. निम्न स्तरावरील शिक्षणानेही व्यापक, मूल्याधारित शिक्षणाचा पाया प्रदान केला पाहिजे. तंत्रज्ञान बदलते आणि उच्च शिक्षणात घेतलेले चार वर्षांचे शिक्षण कमी पडते. म्हणून, बहु-विद्याशाखीय अभ्यासाची सवय लावून घेत निरंतर शिकवत राहणे काळाची गरज आहे.
या विद्यापीठात कोणती परीक्षा नाही की गुण नाहीत, प्रमाणपत्र नाही की लेक्चर्स आणि प्रॅक्टिकलही नाहीत. मात्र, या विद्यापीठातील सर्व विद्यार्थी अनुभवातून शिकत आहेत. जग कोविडनंतर प्रचंड वेगाने बदलले आहे. यात नवीन कौशल्य आत्मसात करणे, हेच खरे शिक्षण आहे. धांडे यांनी मानवी मूल्ये, प्रश्नोत्तर संवाद, नैतिकता, शिस्त, कुतूहल, निरीक्षण अशा जीवनाच्या मूलभूत घटकांवर भर देण्यास सांगितले. लाइफ लाँग लर्निंग युनिव्हर्सिटीत पदवी नाही. तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी राहाल, यामुळे तुमचे जीवन सतत समृद्ध राहील. विचलित करणारे, अनेक मोहमयी, पण धोकादायक मार्ग तुम्हाला खुणावतील; पण वैयक्तिक सचोटी आणि प्रामाणिकपणा यावर ठाम राहा, असा आग्रह धांडे यांनी धरला.
यावेळी कुलगुरू शिर्के यांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस प्रारंभ केल्याचे सांगत विद्यापीठाच्या वार्षिक अहवाल सादर केला. नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी कक्षाद्वारे २००२ ते २०२१ या १९ वर्षांच्या कालावधीतील (३८ वा ते ५७ वा दीक्षांत समारंभ) पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची ७,४०,८५० इतकी प्रमाणपत्रे डिजिलॉकरमध्ये अपलोड केल्याचे, तसेच अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटसाठी पोर्टलवर एकूण ९८ टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. धांडे यांच्या हस्ते महेश माणिक बंडगर यास राष्ट्रपती सुवर्णपदक आणि सोहम तुकाराम जगताप यास कुलपती सुवर्णपदक देण्यात आले. पीएचडीसह ६२ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील आणि सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार मानले.
तत्पूर्वी, मुख्य प्रशासकीय भवनापासून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली दीक्षांत मिरवणूक काढण्यात आली. यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. डॉ. सरिता ठकार, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख आणि डॉ. मेघा गुळवणी यांनी त्यांच्या विद्याशाखेच्या स्नातकांना सादर केले आणि कुलपतींनी त्यांना पदवी अनुग्रह करण्यास मान्यता दिली. दोन वर्षांनंतर यंदाचा दीक्षांत सोहळा ऑफलाइन पद्धतीने झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांत कमालीचा उत्साह होता.