नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी देवस्थानच्या ३२५ गुंठे जमिनीचे संपादन, समितीने मागितली नुकसान भरपाई
By इंदुमती सूर्यवंशी | Published: January 23, 2023 01:11 PM2023-01-23T13:11:23+5:302023-01-23T13:12:02+5:30
ही रक्कम नेमकी कोणाला द्यायची हा पेच
इंदुमती गणेश
कोल्हापूर : बहुचर्चित नागपूर-रत्नागिरीमहामार्गासाठी सुरू असलेल्या चोकाक ते आंबा येथील भूसंपादनात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीतील १३२ मंदिरांची ३२५ गुंठे जमीन संपादित होणार आहे. त्यासाठी देवस्थान समितीने भूसंपादन विभागाला रीतसर पत्र पाठवून नुकसानभरपाई मागितली असून ही रक्कम १५ कोटी ७९ लाख इतकी आहे. ही रक्कम आता कसणाऱ्या शेतकऱ्याला द्यायची की देवस्थान समितीला हा पेच आहे.
नागपूर-रत्नागिरीमहामार्गासाठी सध्या चोकाक ते आंबा येथील भूसंपादन वेगाने सुरू असून, त्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यादेखील जमिनींचा समावेश आहे. त्यामुळे मागील आठवड्यात देवस्थान समितीने भूसंपादन विभागाला पत्र पाठवून नुकसानभरपाई मागितली आहे. त्यात देवस्थाने व गावांची नावे दिली आहेत, पण गट नंबर दिले नव्हते. त्यामुळे भूसंपादन विभागाने सातबारा व गटनिहाय जमिनींची माहिती गोळा केली आहे. त्यानुसार समितीची ३२५ गुंठे जमीन संपादित होणार आहे. त्यासाठी काढलेली नुकसानभरपाईची रक्कम तब्बल १५ कोटी ७९ लाख इतकी आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या हजारो एकर जमिनी असल्या तरी त्या लागणदार व वहिवाटदारांकडे आहेत. देवस्थानला कुळ कायदा लागू होत नाही. जमीन संपादित केल्याने देवस्थान आणि शेतकरी दोघांचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे दोघांनी नुकसानभरपाई मागितली असून आता नेमकी रक्कम कुणाला द्यायची व किती द्यायची यावर चर्चा सुरू आहे.
२००६ चा निर्णय
भूसंपादन विभाग जिल्हा प्रशासनाअंतर्गत आहे आणि देवस्थान समितीचे प्रशासक जिल्हाधिकारी आहेत. रक्कम देवस्थानला द्यायची की शेतकऱ्यांना यावर मार्ग काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने देवस्थानांच्या प्रकरणात दिलेला निकाल तसेच २००६ सालच्या शासन निर्णयाचा आधार घेतला जाणार असून कायद्यात बसेल त्या पद्धतीने नुकसानभरपाई दिली जाईल.
कमीतकमी पावणेतीन लाख दर
राष्ट्रीय महामार्गासाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनासाठी गुंठ्याला कमीत कमी अडीच ते पावणेतीन लाख रुपये दर देण्यात आला आहे. शेती, बिगर शेती, महामार्गालगतची जमीन अशा प्रकारानुसार दर ठरविण्यात आले आहेत.
एजंटांना बळी पडू नका
भूसंपादनासाठी चांगला दर मिळाल्याने त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळाला आहे. पण अनेक शेतकरी, खातेदार एजंटांना बळी पडत आहेत. भूसंपादन विभागाचे नाव सांगून शेतकऱ्यांकडून पैसे वसूल केले जात आहेत. तरी नागरिकांनी या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन विभागाने केले आहे.
तालुकानिहाय देवस्थानच्या मंदिरांची यादी
- हातकणंगले : २० गट
- शाहूवाडी : ६० गट
- करवीर : २१ गट
- पन्हाळा : ३१ गट