कोल्हापुरात शेतकरी संघाच्या इमारतीचे अधिग्रहण: सभासदांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:47 PM2023-09-27T12:47:56+5:302023-09-27T13:04:57+5:30
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या नवरात्र उत्सवात उभारला जाणारा दर्शन मंडप भाविकांच्या संख्येत अपुरा पडत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी संघाच्या ...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या नवरात्र उत्सवात उभारला जाणारा दर्शन मंडप भाविकांच्या संख्येत अपुरा पडत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी संघाच्या इमारतीचे अधिग्रहण तात्पुरत्या स्वरूपात केले आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात संघाच्या सभासदांनी आज, बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामोर्चात सर्वपक्षीय नेते देखील सहभागी झाले होते. सहकार मोडीत काढणाऱ्या राज्यशासनाचा धिक्कार असो, वाचवा वाचवा, सहकार वाचवा, जिल्हाधिकारी चले जाव यासह शेतकरी संघाच्या समर्थनात फलक हाती घेत मोठ्या संख्येने सभासद बांधव मोर्चात सहभागी झाले होते.
शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील इमारतीमधील तीन मजले देवस्थान समितीने ताब्यात घेतल्याने वाद उफाळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२५) झालेल्या बैठकीत सभासदांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला. शेतकरी सहकारी संघाची जागा ताब्यात घेतली नाहीतर त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दरोडा टाकला असून जिल्ह्यात आता कोणती आपत्ती आली म्हणून एवढ्या तातडीने जागा ताब्यात घेतली? असा सवाल करत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आडून पालकमंत्री दीपक केसरकर यांना ही जागा बळकावयाची आहे. असा आरोपही करण्यात आला.
इमारतीचे तात्पुरते अधिग्रहण, शेतकरी संघाला सहकार्याचे आवाहन
शेतकरी संघाच्या इमारतीचे अधिग्रहण तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आले आहे. त्याद्वारे मालकी बदलता येत नाही. शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचविण्याचा उद्देश देवस्थान समितीचा नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या लोककल्याणकारी मार्गावरच प्रशासन सदैव मार्गक्रमण करत राहील तरी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी केले आहे.