शेतकरी संघावर ‘८८’ ची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:24 AM2021-04-06T04:24:11+5:302021-04-06T04:24:11+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघामध्ये गेली तीन-चार वर्षे अनागोंदी कारभार सुरू असून लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार ...
राजाराम लोंढे,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघामध्ये गेली तीन-चार वर्षे अनागोंदी कारभार सुरू असून लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार संघावर कलम ‘८८’ ची कारवाई करण्यात आली आहे. गूळ विभागात बेकायदेशीर दिलेला ॲडव्हास, मशिनरी स्पेअरपार्ट विभागातील गैरव्यवहार, बोगस नफा, भांडी कारखाना जागा विक्रीतील त्रुटींची गंभीर दखल सहकार विभागाने घेतली असून त्यांची चौकशी करून संचालकांवर जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
शेतकरी संघातील बेकायदेशीर कारभार नवीन नाही. या पंचवार्षिकमध्ये कारभारी संचालकांनी सर्वोच्च टोक गाठले होते. अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर येणाऱ्यांनी कारभारी संचालकांना सोबत घेऊन बेकायदेशीर कामे केली आहेत. विजयकुमार चौगुले या संचालकांनी तर गूळ अडत दुकानातून अकरा लाखाची उचल केली होती, त्यातील पाच लाख रुपये दुसऱ्या संचालकाला दिले होते. लेखापरीक्षकांनी पैसे भरण्याचा रेटा लावल्यानंतर संघ व्यवस्थापनानेच संघाच्या चार पेट्रोलपंपावरील रोकड उचलून ते पैसे भरले. शिरोळ येथील खत विभागात लाखो रुपयांचा अपहार झाला होता. यामध्ये संघाचे वरिष्ठ अधिकारीही सामील होते, मात्र त्यांना वाचवून ठराविक कर्मचाऱ्यांना पुढे केले. संघाच्या मालकीच्या जागा बेकायदेशीरपणे सोडल्या आहेत, असे अनेक ठपके लेखापरीक्षणात ठेवण्यात आले आहेत.
महेश गुरव ॲन्ड कंपनी या सनदी लेखापरीक्षकांनी २०१९-२०२० या कालावधीतील वैधानिक लेखापरीक्षण केले. यामध्ये त्यांना गंभीर बाबी समोर आल्या. याबाबत उचित कारवाई करावी, अशी त्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी संघाची कलम ८८ अन्वये चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी शहर उपनिबंधक प्रकाश जगताप यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
प्राधिकृत अधिकाऱ्यांना २० हजार मेहनताना
प्राधिकृत अधिकारी प्रकाश जगताप यांना संघाने वीस हजार रुपये मेहनताना द्यायचा आहे. संबंधित रक्कम शहर उपनिबंधक यांच्या जिल्हा बँकेच्या खात्यावर भरण्याचे आदेश दिले आहेत.
विजयकुमार चौगुलेंना अभय कोणाचे?
विजयकुमार चौगुले यांनी गुळापोटी अकरा लाख रुपयांची उचल केली. त्याचे साडेचार लाख रुपये व्याज झाले होते. विशेष म्हणजे मुद्दल भरण्याआधी व्याज माफीसाठी त्यांनी संघाकडे अर्ज दाखल केला होता. ते संचालक पदावर राहण्यास अपात्र ठरत असताना, त्यांना अभय देण्यात आले. चौगुलेंना अभय देणारे हात कोणाचे होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
या मुद्द्यांची होणार चौकशी...
मशिनरी स्पेअर पार्ट विभागातील व्यवहार
गूळ विभागाने दिलेले ॲडव्हान्स
विजयकुमार चौगुले हे संचालक राहण्यास अपात्र असताना उचित कारवाई का नाही
प्रलंबित महसुली खर्च
इमारत भाडे उत्पन्न त्रुटीबाबत
एमआयडीसी येथील भांडी कारखाना जागा विक्री व्यवहार
कर्मचारी अपहार व फेरनियुक्ती
सेवानिवृत्त प्रॉव्हिडंट फंड व ग्रॅच्युुईटी
खत विभागातील व्यवहार
२०१९-२० आर्थिक पत्रके, दर्शवलेला बोगस नफा
लोकमत इफेक्ट (कात्रण -०५०४२०२१-कोल-शेतकरी संघ)