विनामास्क प्रकरणी ४०९ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:28 AM2021-05-25T04:28:39+5:302021-05-25T04:28:39+5:30
कोल्हापूर : लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर सोमवारी पहिल्या दिवशीच नागरिकांची रस्त्यावर झुंबड उडाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दिवसभरात विनामास्क ...
कोल्हापूर : लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर सोमवारी पहिल्या दिवशीच नागरिकांची रस्त्यावर झुंबड उडाली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्या ४०९ जणांवर तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७६५ दुचाकींवर पोलिसांनी कारवाई केली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गत आठवडाभर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केले होते. त्यानंतर सोमवारपासून काहीअंशी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. याचा गैरफायदा घेऊन विनामास्क रस्त्यावर फिरणाऱ्या सुमारे ४०९ जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत ९४ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. त्याशिवाय मोटर वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या १६८६ वाहनधारकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सुमारे २ लाख ९९ हजार ६०० रुपये दंड बसवला. तसेच अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्या ७७ दुचाकी जप्त करण्यात आल्या. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून अस्थापना सुरू ठेवणाऱ्या ७७ जणांकडून एकूण ८२ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. मॉर्निंग वॉक करणाऱ्या ५३ जणांकडून २२ हजार १०० रुपये दंड वसूल केला.
विनामास्कप्रकरणी ४६ लाख, मॉर्निंग वॉकचा पावणेनऊ लाख रुपये दंड
दि. ४ ते २४ मेपर्यंत लाॅकडाऊनमध्ये जिल्ह्यात विनामास्कप्रकरणी २० हजार ६४७ जणांकडून ४६ लाख ३ हजार रुपये तर मॉर्निंग वॉकप्रकरणी २४५८ जणांकडून ८ लाख ७७ हजार रुपये दंड वसूल केला. त्याशिवाय मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ७७,३०३ वाहनांवर गुन्हे नोंदवून त्यांना १ कोटी ३२ लाख ५३ हजार रुपये दंड केला आहे.