हुपरीत ५० मोटरसायकलस्वारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:22 AM2021-04-17T04:22:33+5:302021-04-17T04:22:33+5:30
सर्वत्र संचारबंदी जाहीर झाली असताना अनेकजण बिनकामाचे शहरातील रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी बंदी आदेश असताना ...
सर्वत्र संचारबंदी जाहीर झाली असताना अनेकजण बिनकामाचे शहरातील रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी बंदी आदेश असताना शहरात विनाकारण मोकाटपणे फिरणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली होती. त्यामुळे हुपरी पोलिसांना ही धडक कारवाई हाती घ्यावी लागली.
शुक्रवारी सकाळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी यादव यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुपरी, रेंदाळ, यळगूड, तळंदगे, पट्टणकोडोली, इंगळी गावात जाऊन पोलीस बंदोबस्तात तपासणी नाके उभारले. त्याबरोबरच हुपरी शहरात रहदारी वाढल्याने पोलीस ठाण्यासमोर पोलीस निरीक्षक मस्के यांनी खुर्ची टाकून स्वतः मोटरसायकलस्वारांसह येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. पोलिसांनी कारवाई करत तासाभरात तब्बल पन्नासहून अधिक मोटरसायकली ताब्यात घेतल्या. यामुळे अल्पावधीतच शहरातील मुख्य रस्ता सामसूम झाला.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापुढे बिनधास्त फिरणाऱ्या मोटरसायकलस्वारांसह संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, कुणाची गय केली जाणार नाही. त्यामुळे शहरवासीयांनी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस निरीक्षक मस्के यांनी दिला आहे.
फोटो ओळी -
हुपरी (ता. हातकणंगले) शहरात संचारबंदी काळात मोकाट फिरणाऱ्या तब्बल पन्नासहून अधिक मोटरसायकलस्वारांवर हुपरी पोलिसानी जप्तीची कारवाई केली.