विभागीय चौकशीअंती पाच पोलिसांवर कारवाई : तीन पोलीस सेवेतून बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 04:03 PM2020-09-04T16:03:16+5:302020-09-04T16:09:05+5:30
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील पाच पोलिसांवर विभागीय चौकशीअंती कारवाई करण्यात आली. यापैकी तिघांना बडतर्फ करण्यात आले, तर एका महिला पोलिसास सक्तीने सेवानिवृत्ती आणि एकावर खात्यातून कमी करण्याची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुरुवारी रात्री केली.
कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलातील पाच पोलिसांवर विभागीय चौकशीअंती कारवाई करण्यात आली. यापैकी तिघांना बडतर्फ करण्यात आले, तर एका महिला पोलिसास सक्तीने सेवानिवृत्ती आणि एकावर खात्यातून कमी करण्याची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुरुवारी रात्री केली. कर्तव्यात बेशीस्तपणा, गैरवर्तन, निष्काळजीपणासह नियमांचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला आहे. एकाचवेळी पाचजणांवर झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
कारवाई केलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे : पोलीस नाईक अमित दिलीप सुळगांवकर, नारायण पांडुरंग गावडे, महादेव पांडुरंग रेपे या तिघांना सेवेतून बडतर्फ केले, तर महिला शिपाई समिना दिलावर मुल्ला यांना सक्तीने सेवानिवृत्त केले, तर पोलीस नाईक संतोष हरी पाटील यांना खात्यातून कमी केले.
पोलीस नाईक अमित सुळगांवकर याची सध्या पोलीस मुख्यालयात नेमणूक केली होती. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सेवेत असताना त्यांच्याकडे एक व्यक्ती त्रास देत असल्याचा तक्रार अर्ज एका महिलेने दिला होता. त्याने तो स्व:तजवळ ठेवून वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिला नाही. तसेच संबंधित संशयिताशी त्याने परस्पर संपर्क केला, असा त्याच्यावर ठपका ठेवला होता.
याशविाय गांधीनगर पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस नाईक नारायण गावडे, महादेव रेपे या दोघांचे बेटिंग बुकीशी लागेबंधे, संबध असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार तिघांचीही विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात ते दोषी आढळल्याने तिघांना बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले.
दरम्यान, राजारामपुरीतील महिला पोलीस समिना मुल्ला यांची दि. ८ डिसेंबर २०१७ मध्ये मुख्यालयात बदली केली, त्यानंतर त्यांनी वैद्यकीय रजेवर असल्याचे कळविले, पण तसे प्रमाणपत्र सादर केले नाही.
परवानगी न घेता सांगलीचा पोलीस जयसिंगपुरात हजर
सांगली जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक संतोष पाटील हे सध्या कागल येथे नेमणुकीस होते. ते सांगलीतून परवानगी न घेता जयसिंगपुरात आले. त्यांचे सहकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध नव्हते, असा ठपका त्यांच्यावर ठेवला होता. विभागीय चौकशीअंती तेही दोषी आढळल्याने त्यांच्यावरही सक्तीने सेवानिवृत्ती व खात्यातून कमी करण्याच्या कारवाईचे आदेश दिल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.
विभागीय चौकशीमध्ये पाचही जणांनी कर्तव्यात कसूर करून नियमांचा भंग केल्याचा त्यांच्यावर दोष ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
- डॉ.अभिनव देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर