जिल्हा बॅँक गोत्यात येण्यासाठीच ‘कुमुदा’वर कारवाई
By admin | Published: January 24, 2016 01:02 AM2016-01-24T01:02:23+5:302016-01-24T01:02:23+5:30
हसन मुश्रीफ : चंद्रकांतदादांवर डागली तोफ; ठेवींवर परिणाम झाल्यास दादाच जबाबदार
कोल्हापूर : सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाची दिशा पाहिली तर ते सुडाने पेटले असून, जिल्हा बॅँक अडचणीत यावी, म्हणूनच त्यांनी ‘कुमुदा शुगर्स’वर कारवाई केल्याचा आरोप जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
गतवर्षीच्या तुलनेत जिल्हा बॅँकेच्या ठेवींत ३६१ कोटींची वाढ झाली आहे. तरीही चंद्रकांतदादा पाटील सातत्याने बॅँकेला लक्ष्य करीत असून, यामुळे बॅँकेचे जे नुकसान होईल, त्याला सर्वस्वी तेच जबाबदार
असतील, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला.
आमदार मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काटकसरीचा कारभार सुरू आहे. खर्चात काटकसर करीत असतानाच कोणाचाही मुलाहिजा न बाळगता आम्ही सनई-चौघड्यासह वसुली मोहीम राबवीत आहोत. ओटीएस योजनेत ५४ संस्थांनी सहभाग घेतला असून, त्यातून २० संस्थांनी एक कोटी ४१ लाख रुपये भरलेले आहेत. गायकवाड कारखान्याच्या थकबाकीसाठी अथणी शुगर्स व तंबाखू संघाचे संजय पाटील सोमवारी (दि. २५) बॅँकेत येऊन चर्चा करणार आहेत. ही थकबाकी वसूल झाली, तर एनपीए पाच टक्क्यांपर्यंत खाली येण्यास मदत होणार आहे. प्रशासकीय व संचालक मंडळाच्या कालावधीची तुलना केल्यास ठेवींमध्ये ३६१ कोटी, तर कर्जात १५९ कोटींची वाढ झाली आहे. सीडी रेशो ८०.६६ टक्क्यांपर्यंत आला आहे. ठेवी वाढल्या हे कशाचे द्योतक आहे? पण सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे. ‘दौलत’बाबत अनेक वेळा निविदा काढल्यानंतर ‘कुमुदा’ने एक कोटी रुपये बयाणा रक्कम भरून कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याची तयारी दर्शविली; पण त्यांनाही त्रास देण्यास सुरुवात केली आहे. ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत याबाबत दुमत नाही; पण एफआरपी थकविणारा ‘कुमुदा’ एकटाच आहे काय? त्यांच्यावर फौजदारी करून उपाध्यक्षाला अटक केली, बॅँकेची खाती गोठवली. एखादा माणूस सूडबुद्धीने पेटला की काय करू शकतो, हे दिसत असून दादांनी आमच्यावर राग काढावा; पण
जिल्हा बॅँक अडचणीत येईल, असे काही वक्तव्य करू नये. बॅँकेवर शेतकऱ्यांचे संसार उभे आहेत, याचे भान ठेवावे.
यावेळी उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक के. पी. पाटील, बाबासाहेब पाटील, भैया माने, सर्जेराव पाटील, विलास गाताडे, असिफ फरास, संतोष पाटील, प्रतापसिंह चव्हाण उपस्थित होते.
कलम ‘८८’मध्ये जमेना म्हणूनच वटहुकूम !
मंत्री पाटील यांचे सर्व राजकारण जिल्हा बॅँकेभोवती फिरत असून सुरुवातीला सचिन रावळ यांच्यावर दबाव टाकून कलम ‘८८’ची कारवाई केली. त्यामध्ये काही जमेना म्हटल्यावर आता वटहुकूम काढला. कोणताही कायदा पूर्वलक्षी प्रभावाने केला जात नाही. याबाबतच्या नोटिसा मिळताच न्यायालयात दाद मागू, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
‘दत्त-आसुर्ले’चा निर्णय उपयोगी पडेल
दत्त-आसुर्ले कारखाना भाडेतत्त्वावर देऊन तीन हंगाम घेतले. बॅँकेचे हप्ते वेळेत सुरू असताना तत्कालीन सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी कोणाच्या तरी सोयीसाठी कारखाना अवसायनात काढला. अवसायनात काढलेल्या संस्थेची संपूर्ण थकबाकीची ‘एनपीए’ची तरतूद करावी लागली. त्याचबरोबर भुदरगड पतसंस्थेची वसुली केली आणि एक ठेवीदार कोर्टात गेल्याने दहा कोटी स्टेट बॅँकेत जमा करावे लागले. या तांत्रिक अडचणीमुळे बॅँकेचा एनपीए वाढला आणि प्रशासक आले. याविरोधात आम्ही न्यायालयात गेलो होतो. त्याचा उपयोग आम्हाला या कारवाईमध्ये होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
‘दौलत’बाबत ३० जानेवारीला निर्णय
‘दौलत’बाबत ‘कुमुदा’ करार रद्द करीत असल्याचे समजते. व्यवहार पूर्ण करण्याची मुदत ३० जानेवारीपर्यंत आहे. तोपर्यंत ‘कुमुदा’ काय निर्णय देते, ते पाहून त्याच दिवशी ‘दौलत’ची विक्री करायची
की आणखी काय करायचे, हे
ठरवू; पण कोणत्याही परिस्थितीत मार्चपर्यंत ‘दौलत’चा तिढा
सोडवावाच लागेल अन्यथा बॅँक अडचणीत येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.