ST Strike : कोल्हापूर जिल्ह्यातील ३८ एसटी कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 03:30 PM2021-11-13T15:30:38+5:302021-11-13T18:00:14+5:30
राज्य सरकारने शनिवारी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील आठ विभागातील ३८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. कारवाईत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत
कोल्हापूर : राज्य सरकारने शनिवारी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील आठ विभागातील ३८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. कारवाईत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून नोटीस मिळताच आंदोलनाच्या ठिकाणी असलेले कर्मचारी आक्रमक झाले. कारवाई करायची तर सर्वांवरच करा, अशी भूमिका घेतल्याने कर्मचाऱ्यांत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. तर जिल्ह्यात आता पर्यंत एकूण ४५ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे.
दरम्यान, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे गात एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी येथील मध्यवर्ती बसस्थानकात भजन केले. सहाव्या दिवशी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच राहिले. एक रूपयांचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता, आमच्या मागण्या मान्य करा, हम सब एक है अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडले.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. कोल्हापुरातही गेल्या सहा दिवसांपासून मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एसटी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनामुळे बस सेवा बंद असल्याने प्रवाशांनीही बसस्थानकांकडे पाठ फिरवली. ते पर्यायी व्यवस्था शोधल्याचे दिसले.