कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:15 AM2021-03-30T04:15:39+5:302021-03-30T04:15:39+5:30
इचलकरंजी पोलीस ठाण्याला भेट लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : गुन्ह्याची व्याप्ती जाणून घेऊन त्याचा तपास करावा. पोलीस ठाण्यात येणाऱ्या ...
इचलकरंजी पोलीस ठाण्याला भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : गुन्ह्याची व्याप्ती जाणून घेऊन त्याचा तपास करावा. पोलीस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदाराला न्याय द्यावा. तक्रार न घेणे, कर्तव्यात कसूर करणे अशा पोलिसांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी दिला.
गावभाग पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. लोहिया म्हणाले, तक्रारींची संख्या किती वाढते, याकडे दुर्लक्ष करून त्यातून संबंधित तक्रारदाराला न्याय देणे पोलिसांचे कर्तव्य आहे. प्राप्त तक्रारींवर सखोल काम होणे. दाखल गुन्हे निकाली निघणे, पोलिसांच्या कारवाईचा गुन्हेगारांवर धाक निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रत्येक तक्रारीचा सखोल तपास करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. शहर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला जात असून, लवकरच ती आटोक्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी, आदींसह पोलीस निरीक्षक, अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, त्यांनी सीसीटीव्ही कक्षाचे सुरू असलेल्या कामाची पाहणी करून सूचना दिल्या.