राणेंवर कारवाई अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:29 AM2021-08-25T04:29:27+5:302021-08-25T04:29:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी कोल्हापुरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढून आईसाहेब महाराज चौकात राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
केंद्रीय मंत्री राणे यांनी सुरू केलेल्या जन आशीर्वाद यात्रेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्या केले, त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने राणे यांच्या निषेधाचे फलक झळकावत घोषणा दिल्या. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत आहेत तर ‘मातोश्री’ हे आमचे मंदिर आहे. आमच्या मंदिरावर कोणी टीका करत असेल तर त्याला सोडणार नाही. शिवसेनेने पदे दिली व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आज तुम्ही येथे आहात, याचे भान ठेवा. राणे यांनी स्वत:च्या स्वार्थापोटी अनेक पक्ष बदलले, उद्या भाजपही त्यांना बाजूला करेल. राणे यांच्यावर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल.
राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर शिवसैनिकांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडे मोर्चा वळवला. येथे राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी संजय पवार व विजय देवणे यांनी आग्रह धरला. अखेर गुन्हा दाखल करून घेण्यात आला. यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, विनायक साळुंखे, राजू यादव, मंजीत माने, हर्षल सुर्वे, विनोद खोत, राजू जाधव, गीतांजली गायकवाड आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : शिवसेनेच्या वतीने मंगळवारी कोल्हापुरात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते. (फोटो-२४०८२०२१-कोल-शिवसेना) (छाया : नसीर अत्तार)