‘सीईओं’च्या कारवाईचे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ‘स्थायी’मध्ये पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 10:45 AM2019-03-22T10:45:15+5:302019-03-22T10:48:11+5:30
ठेकेदार सदस्यांनी आपल्या कामाच्या फाईल्स स्वत:च आणून सह्या घेण्याचा सपाटा लावल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घेतलेल्या संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाच्या निर्णयाचे पडसाद जिल्हा परिषदेच्या बुधवारी (दि. २०) झालेल्या स्थायी सभेमध्ये उमटले.
कोल्हापूर : ठेकेदार सदस्यांनी आपल्या कामाच्या फाईल्स स्वत:च आणून सह्या घेण्याचा सपाटा लावल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घेतलेल्या संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाच्या निर्णयाचे पडसाद जिल्हा परिषदेच्या बुधवारी (दि. २०) झालेल्या स्थायी सभेमध्ये उमटले.
अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेसाठी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडक र, अरुण इंगवले, जयवंतराव शिंपी, युवराज पाटील, कल्लाप्पाणा भोगण, राजवर्धन निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी अरुण इंगवले आणि प्रवीण यादव यांच्या महामंडळावर निवडी झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
बैठकीमध्ये भोगण यांनीच हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, आचारसंहिता लागणार असल्याने हे काम झाले नाही तर त्या गावाने लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मी स्वत: या कामाची फाईल घेऊन आलो होतो; परंतु त्यामागील पार्श्वभूमी न पाहता संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले. या प्रकरणामध्ये आमची नाहक बदनामी झाली. यावेळी सर्वच सदस्यांनी भोगण यांची बाजू घेतल्यावर सीईओ मित्तल यांनी वारंवार सूचना देऊनही हे प्रकार वाढू लागल्याने आपणी तशी भूमिका घेतल्याचे सांगितले.
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याबाबतच्या अहवालावरही यावेळी चर्चा झाली. यावर अजूनही शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांची सही झालेली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समितीची बैठक घेऊन त्यामध्ये अहवाल मांडण्याच्या सूचना अध्यक्षा महाडिक यांनी दिल्या.
बांधकाम विभागाच्या फाईल्स तीन-तीन वेळा पाच-सहा टेबल्स फिरून सीईओंकडे येतात. या प्रक्रियेमुळे कर्मचारी आजारी पडत आहेत. यातील काही टेबल्सची संख्या कमी करता येते का, याचा विचार करावा अशी सूचना राजवर्धन निंबाळकर यांनी केली.
आरोग्य सभापती, आरोग्याधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव
‘आळते येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोल्हापुरात अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी म्हणून तुम्ही कधी आणि का आणले, तुमची सोय बघता काय?’ अशी विचारणा सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांना केली. यावर साळे यांनी, ‘वाटल्यास त्यांना परत पाठवितो,’ असे उत्तर दिले. यावेळी ज्येष्ठ सदस्य जयवंतराव शिंपी यांनी आरोग्य सभापती आणि आरोग्याधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे हे उदाहरण आहे. या चर्चा करायचे हे ठिकाण आहे का, अशी विचारणा केली.