चित्रपट महामंडळाचे कामकाज कृती समितीने दिवसभर रोखले
By admin | Published: December 31, 2015 12:10 AM2015-12-31T00:10:12+5:302015-12-31T00:16:54+5:30
भालचंद्र कुलकर्णी : धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत १२ डिसेंबरला संपली असून, धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकारही राहिलेला नाही; म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट-नाट्य व्यावसायिक कृती समितीने बुधवारी दिवसभर महामंडळाचे कार्यालयीन कामकाज रोखून धरत कार्यालयातच ठिय्या मारला.
विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाल संपल्याने पदाधिकाऱ्यांना महामंडळाच्या घटनेप्रमाणे कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. होऊ घातलेला ‘चित्रभूषण पुरस्कार’ हाही घटनाबाह्य कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च येणार आहे. हा कार्यक्रम घेतल्यास तो सर्व खर्च विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या नावावर टाकून त्यांच्याकडून वसूल करावा. याशिवाय मुदत संपल्यानंतर ६ जानेवारी २०१६ ची महासभा होऊ शकत नाही. यापूर्वीच दोन सर्वसाधारण सभा घेणे अपेक्षित होते. याबाबत धर्मादाय आयुक्तांनी ताशेरेही ओढले आहेत.
अशा पद्धतीने बेकायदेशीर कारभार सुरू आहे. याचबरोबर विद्यमान उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्याकडे तत्कालीन अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी सात लाख ३४ हजार ३६३ रुपयांची रक्कम दिली असताना ती अष्टेकर यांनी कार्यालयाकडे का भरली नाही? मुंबई कार्यालयातील अकौंटंट, संगणक आॅपरेटर, शाखा व्यवस्थापक यांना त्यांच्यावरील आरोप अजूनही सिद्ध झाला नसतानाही कामावरून का कमी केले? नाडगौंडा व चिंडक यानी तयार केलेला फेरलेखापरीक्षण अहवाल सभासदांकरिता जाहीर करावा. याचबरोबर सर्वसाधारण सभेचे नियोजन ठरलेल्या तारखेलाच करावे. ही सभाही धर्मादाय आयुक्त किंवा उपायुक्त यांच्या अधिकाराखालीच संयोजित करावी. यासह अन्य मागण्या करीत त्यांनी महामंडळाचे कामकाज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रोखून धरले. यावेळी कृती समितीने निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर हे कार्यालयात दिवसभर उपस्थित नव्हते. यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले, मुदत संपल्यानंतर कुठलाही धोरणात्मक निर्णय विद्यमान संचालकांना घेता येणार नाही. त्यामुळे महासभाही धर्मादाय आयुक्तांच्या संयोजनाखाली घ्यावी.
यावेळी सुरेंद्र पन्हाळकर, अर्जुन नलवडे, अभिनेत्री छाया सांगावकर, हेमसुवर्णा मिरजकर, केशव पंदारे, मधुकर वाघे, बबिता काकडे, मंगला साखरे-विधाते, बापू घराळ, श्रद्धा पवार, अशोक जाधव, उषा माने, धनंजय पंडित, विलास मोरबाळे, अर्चना दार्इंगडे, विवेक कोरडे, मंगेश मंगेशकर उपस्थित होते.