हद्दवाढीस कृती समितीचा विरोध
By admin | Published: May 27, 2015 12:27 AM2015-05-27T00:27:48+5:302015-05-27T00:58:41+5:30
तीव्र आंदोलन : जूनमध्ये घेणार मेळावा
कोल्हापूर : शहर विकासाचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाढत्या शहरीकरणात उपनगरांच्या समस्या सोडविण्यात प्रशासनास यश आलेले नाही. महापालिका प्रशासनाने निमंत्रण दिल्यास बाजू मांडण्यासाठी कार्यशाळेला उपस्थित राहणार. मात्र, हद्दवाढीविरोधी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी माजी आमदार संपतराव पवार यांच्या उपस्थितीत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती हद्दवाढविरोधी कृती समितीचे समन्वयक नाथाजी पोवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
महानगरपालिकेने उपनगरांसह शहरात काय विकास केला आहे, हे आतापर्यंत ग्रामीण जनतेने पाहिले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढीचा एकतर्फी निर्णय घेऊ दिला जाणार नाही. एखादा निर्णय घेताना जनमानसाच्या भावनेचा विचार न करता तो लादण्याचा प्रयत्न केल्याने टोलसारखे भूत जनतेच्या मानेवर बसण्याची शक्यता आहे. आताही तीच चूक महापालिक ा व शासन पुन्हा करू पाहत आहे. ग्रामीण जनतेचा विरोध असताना त्यांना कायद्याचे भय दाखवून शहरात आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी किंवा तत्सम योजनांच्या माध्यमातून निधी मिळविण्यासाठी फक्त हद्दवाढ हाच निकष नाही. शहर विकासासाठी शासनाने सढळ हाताने निधी द्यावा, हद्दवाढीची टूम काढू नये, अशी प्रतिक्रिया कृती समितीच्या सदस्यांतून उमटत आहे.
मागील वेळेप्रमाणेच यावेळीही संभावित गावांच्या अकृषक रोजगाराची टक्केवारी चुकीची सादर केली असण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील प्रश्न वेगळे आहेत. तिथे शेतीपूरक व्यवसाय आहेत. ग्रामीण भागात घरबांधणी परवाना पाचशे रुपयांना मिळतो. महापालिकेत त्यासाठी ५० हजार मोजावे लागतात. ग्रामीण जनतेला ओरबाडण्यासाठीच हद्दवाढ करणार का? जनभावनेचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल. शहराचा विकास झाला पाहिजे; पण ग्रामीण जनतेला कोणी वेठीस धरू पाहत असेल, तर त्याविरोधात जनआंदोलन उभारले जाईल. प्रसंगी कायदेशीर लढाईची तयारीही कृती समितीने केली असल्याचे नाथाजी पोवार व ‘भोगावती’चे माजी संचालक बी. ए. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)