ऑपरेशन ऑल आऊटद्वारे गुन्हेगारांवर वचक, सराईत गुन्हेगारांसह ओपन बारवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 01:06 PM2021-01-14T13:06:58+5:302021-01-14T13:08:35+5:30
Kolhapur Police- कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्री इचलकरंजीसह जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, तडीपार, चेन स्नॅचर, खुले बार चालविणाऱ्या आदींवर धाडी टाकत कारवाई केली.
कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्री इचलकरंजीसह जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, तडीपार, चेन स्नॅचर, खुले बार चालविणाऱ्या आदींवर धाडी टाकत कारवाई केली.
या कारवाईत तडीपार केलेले १६ संशयितांच्या घरांवर अचानक धाडी टाकल्या. मात्र, ते मिळून आले नाहीत. चोवीस जणांवर वॉरंट बजावले. एकोणीस फरारी आरोपींचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात ही एकजणही मिळून आला नाही. माहीतगार ९७ गुन्हेगार तपासले. सराईत घरफोडी करणाऱ्या १५ जणांच्या घरांवरही छापे टाकले.
मोटारसायकल चोरी करणारे १० जण व जबरी चोरी करणारे सहा जणांचीही तपासणी केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ९४ जणांची चौकशी केली त्यातून २० जण मिळून आले. दारूबंदी कायद्यांतर्गत १४ व ओपन बारच्या चार गुन्हे दाखल केले.
इचलकरंजीतील एका खुनाच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपीचाही शोध लावण्यात या ऑपरेशनदरम्यान पोलिसांना यश आले. नजीर रसिद मुल्लाणी (वय ३५, रा. फिरंगेमळा, शाहूनगर) हा संशयित गुन्हेगार ताब्यात घेतला.
या कारवाईत पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्यासह दोन अपर पोलीस अधीक्षक, सहा उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक असे ८० जण आणि पाचशे पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.