सातत्य न राखणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई
By admin | Published: October 12, 2015 10:52 PM2015-10-12T22:52:22+5:302015-10-13T00:12:42+5:30
निर्मलग्राम योजना : बक्षीस रक्कम काढून घेणार; हातकणंगलेत बहुसंख्य ग्रामपंचायतींना कागदोपत्री पुरस्कार
दत्ता बीडकर - हातकणंगले-भागात स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी २ आॅक्टोबरला झालेल्या ग्रामसभेमध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्याचा आणि निर्मलग्राम योजनेत सातत्य राखणार नाहीत, त्या ग्रामपंचायतींवर कारवाई करून बक्षीस रक्कम काढून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी राज्य शासनाचा निर्मलग्राम पुरस्कार कागदोपत्री मिळविला आहे. २००७ पासून गावेच्या गावे निर्मलग्रामच्या पाठीमागे लागली होती. पहाटेपासून शासकीय यंत्रणा कामाला लागली होती. गुड मॉर्निंग पथकापासून दिवसाची सुरुवात होत होती.
यासाठी शाळा, कॉलेज, तरुण मंडळांचे कार्यकर्ते झाडून कामाला लागले होते. काही काही गावांमध्ये गांधीगिरी करण्याची वेळ शिक्षक आणि शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवर आली होती. ग्रामस्थ, ग्रामपंचायती आणि तालुका पंचायत समिती या सर्व यंत्रणा निर्मलग्रामसाठी झटत होत्या. निर्मलग्राम कमिटीचे स्वागत, त्याची ऐट हा एक चर्चेचा विषय झाला होता. यातून गावे निर्मलग्राम झाली होती.
निर्मलग्राम गावांनी तीन लाखांपासून दहा लाखापर्यंत केंद्र व राज्य शासनाकडून बक्षीस मिळविले होते. ही बक्षिसाची रक्कम गावे निर्मलग्राम करण्यासाठी खर्च
करणे क्रमप्राप्त असताना ग्रामपंचायतींनी ही रक्कम विकासकामांसाठी खर्च केल्यामुळे गावे आहेत तशीच राहिली. निर्मलग्रामची संकल्पना मागे पडली. पुन्हा राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावे हागणदारीमुक्ती करण्यासाठी कंबर कसली आहे.
१५ आॅगस्ट आणि २ आॅक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये जिल्हा प्रशासनाने नव्या जोमाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि हागणदारीमुक्त गाव योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. तालुकास्तरावर पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांना आदेश देऊन जी गावे यापूर्वी निर्मलग्राम झाली आहेत त्यांनी या योजनेमध्ये सातत्य राखले पाहिजे, अन्यथा त्याची बक्षिसाची रक्कम शासन काढून घेऊन कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायतींना दिला आहे.
या निर्णयामुळे ग्रामपंचायती हागणदारीमुक्तीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी धडपडत आहेत. शासनाने अंगणवाडी सेविकामार्फत २0१२-२0१३मध्ये प्रत्येक गावातील शौचालयाचा सर्व्हे पूर्ण केला आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांसाठी शौचालय बांधकामाकरिता
१२ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही कुटुंबे अद्यापही शौचालय बांधण्यासाठी तयार नाहीत. यामुळे हतबल झालेल्या प्रशासनाने अशा कुटुंबांच्या नागरी सुविधा बंद करण्याचा विचार सुरू केला आहे.
पंचायत समितीचे प्रयत्न
हागणदारीमुक्त आणि निर्मलग्राम योजनेबाबत गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांच्याशी संपर्क साधला असता, हागणदारीमुक्त गाव ही वेगळी संकल्पना आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला दिले जाते. निर्मलग्राम ही केंद्र सरकारची योजना आहे. अद्याप तालुक्यातील कबनूर, कोरोची, रुकडी, माणगाव, हेरले, आळते, जुने पारगाव ही सात गावे निर्मलग्राम झाली नाहीत. यामुळे तालुका निर्मलग्राम झालेला नाही. त्यासाठी पंचायत समितीचे प्रयत्न सुरू असल्याचे मत व्यक्त केले.
४१५ आॅगस्टला कोरोची आणि जुने पारगाव ही दोन गावे हागणदारीमुक्त झाली; पण वरील सात निर्मलग्राम न झालेल्या गावांमध्ये या गावांचा समावेश सर्वांना आश्चर्य वाटणारा आहे.