शहरात बेकायदेशीर मद्य वाहतुकीवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:16 AM2021-07-09T04:16:50+5:302021-07-09T04:16:50+5:30
कोल्हापूर : बेकायदेशीर मद्य वाहतूकप्रकरणी शिवाजी पेठ व हॉकी स्टेडियम या दोन ठिकाणी जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई करत दोघांना ...
कोल्हापूर : बेकायदेशीर मद्य वाहतूकप्रकरणी शिवाजी पेठ व हॉकी स्टेडियम या दोन ठिकाणी जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ६८ हजाराच्या विदेशी मद्यसाठासह दोन चारचाकी वाहने जप्त केली. राहुल श्रीकांत थोरात (वय ३९, रा. शिवाजी पेठ) आणि संभाजी शिवाजी सपकाळ (६०, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी) अशी कारवाई केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी पेठेत वाळके हॉस्पिटलनजीक बेकायदेशीर विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून विदेशी मद्याची मोटार कार संशयावरून पोलिसांनी पकडली. त्याची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे २४ हजार ६७८ रुपये किमतीचे विदेशी मद्याचे बॉक्स मिळाले, त्यातील राहुल थोरात याला ताब्यात घेतले. मद्यासह मोटारकार असा सुमारे २ लाख २४ हजार ६७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, ध्यानचंद हॉकी स्टेडियम ते उमा चित्रमंदिर या मार्गावर विश्वपंढरी समोर रस्त्यावर पोलिसांनी एक चारचाकी वाहन पकडले. त्यामध्ये सुमारे ४३ हजार ६८० रुपयांचा विदेशी मद्याचा साठा जप्त केला. त्या मद्यासह चारचाकी वाहन असा सुमारे ३ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत संभाजी संपकाळ याला ताब्यात घेतले.