कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई
By admin | Published: June 9, 2017 12:06 AM2017-06-09T00:06:30+5:302017-06-09T00:06:30+5:30
कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा ठराव मलकापूर नगरपालिकेच्या विशेष सभेत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमोल केसरकर होते.
प्रभारी मुख्याधिकारी तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी स्वागत केले. पालिकेच्या सेवेत असणारे विविध विभागांतील कर्मचारी यांनी नगरविकास दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात काही कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केला होता. कामावर वेळेवर न येणे, कामावर आले तर कामाच्या नावाखाली कार्यालयाबाहेर फिरणे तसेच नागरिकांची कामे वेळेवर न करणे, आदी प्रकार वाढून कर्मचारी यांच्याबाबत नागरिकांनी पदाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या अनुषंगाने बांधकाम सभापती राजू प्रभावळकर यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. सभेत चर्चा होऊन अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला.
पालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या पालिका कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान रजावेतन देण्यास मंजुरी देण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुटीच्या बदल्यात वेतन देण्याचा ठराव केला. वार्षिक निविदा विविध योजनेतून मंजूर झालेल्या टेंडरबाबत कमी दराच्या निविदा मंजूर फेरटेंडर नोटीस काढण्यास सर्वांनुमते ठरवण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचारी कामिनी हरी पंडत यांच्या वारस रत्नप्रभा हरिचंद पंडत यांना पालिकेच्या सेवेत घेण्याचा ठराव करण्यात आला. पालिकेचे वरिष्ठ कर्मचारी बाबूराव गांधी यांचा सेवानिवृत्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
इंजिनिअर राजेश लाड यांना फेरनिविदा काढेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, तर राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्याची मागणी विरोधी पक्षनेते बाबासाहेब पाटील यांनी केली. राज्यातील शेतकरी कर्जमुक्त झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करा, असे राजू प्रभावळकर यांनी सांगितले.
सभेत नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेवक राजू प्रभावळकर, भारत गांधी, विकास देशमाने, सुहास पाटील, बाबासाहेब पाटील, मानसिंग कांबळे, संगीता पाटील, माया पाटील, अश्विनी लोखंडे, सोनिया शेंडे, आण्णा पळसे, नम्रता कोठावळे, आदींनी चर्चेत भाग घेतला.