नव्या पुरोगामी विचारांसाठी कृती गरजेची
By admin | Published: February 11, 2016 12:09 AM2016-02-11T00:09:23+5:302016-02-11T00:34:41+5:30
जयंत पाटील : के. ब. जगदाळे जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ; विविध क्षेत्रांत कामाचा ठसा उमटविणाऱ्यांचा सत्कार
कोल्हापूर : ज्या शहराने देशाला पुरोगामी विचारांची परंपरा दिली, त्या शहरात नव्या आर्थिक, सामाजिक रचनेत राजर्षी शाहू महाराज व के. ब. जगदाळे यांच्या विचारांना कृतीची जोड देऊन नवा पुरोगामी विचार रुजविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केले.
स्वातंत्र्यसैनिक व माजी नगराध्यक्ष कै. के. ब. जगदाळे (तात्या) यांचा जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ बुधवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार संपतबापू पवार पाटील, कुंडल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण लाड, संभाजी जगदाळे, माजी आमदार सुरेश साळोखे, बाबूराव कदम, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे उपस्थित होते.
या जन्मशताब्दीचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटविणारे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, पंचगंगेत बुडणाऱ्या चौदा लोकांचे प्राण वाचविणारे धाडसी रमेश गवळी, बेवारसांसाठी काम करणाऱ्या किशोर नैनवाणी, युवा कार्यकर्ता प्रसाद जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भाई पाटील म्हणाले, महात्मा फुले, राजर्षी शाहूंनी सर्वसामान्य माणसाला जगण्याचा हक्क मिळवून दिला. देशाला पुरोगामी विचार दिला. त्याच शहरात प्रतिगामी शक्ती फोफावत आहेत. पुरोगामी विचारांची पीछेहाट होत आहे. कारण इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचत नाही. के. ब. जगदाळे यांचा इतिहास, राजकारण, त्यांनी कष्टकऱ्यांसाठी दिलेले लढे, नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवेत, तरच परिवर्तन घडेल. पक्का विचार, पक्के आचरण आणि चांगले चारित्र्य, असे केशवरावांचे आदर्शवत व्यक्तिमत्त्व आहे.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता अनेक गोष्टींचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. के. ब. जगदाळेंचे विचार समाजात का रुजले नाहीत, याचाही विचार करायला हवा. सर्वसामान्यांसाठी निवडणुका लढणे सोपे राहिले नाही. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून वर्तमानकालातील निवडणुकींचे अवलोकन करणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यकाळात कारखानदारच निवडणुका लढवून विजयी होत राहतील.
कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, सर्वसामान्य, गरीब कुटुंबातून आलेल्या केशवरावांनी लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला. नगराध्यक्ष असताना शहराच्या गरजा व अडचणी याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. नि:स्वार्थीपणे आपली जमीन विद्यापीठासाठी देऊन आदर्श निर्माण केला.
संपतबापू पाटील म्हणाले, पुरोगामी विचार सर्वसामान्यांमध्ये रुजविण्यासाठी केशवरावांची आठवण नेहमी काढायला हवी. त्यांची समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, माणसांच्या माणुसकीशी बांधीलकी होती. समाज कसा उभारावा याची जाण त्यांना होती. आजच्या काळात केशवरावांना जाणून घेणे नव्या पिढीसाठी गरजेचे आहे.
जगदाळे जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर राबविलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. अरुण लाड यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक निवास साळोखे यांनी केले. अशोक पोवार यांनी आभार मानले. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले.
टोलचे संकट टळले नाही
टोलमुक्तीवर जयंत पाटील म्हणाले, ‘आयआरबी’च्या म्हैसकरांनी नुकसान भरपाईपोटी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिथून निकाल आल्यावर चारशे क ोटींच्या खर्चासाठी चौदाशे कोटी रुपये द्यावे लागतील अन् शासन हात वर करील. तेव्हा आत्ताच ठरवा, कुणाचा सत्कार करायचा अन् कुणाचा नाही
कॉँग्रेसचे रोपटे
भाई जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात प्रतिगामी शक्ती वाढीस लागण्यास कॉँग्रेस जबाबदार आहे, अशी टीका केली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत ते म्हणाले, प्रतिगामी शक्तींना कॉँग्रेसने पाठीशी घातले. इतिहासात पाहिले तर हे रोपटे कॉँग्रेसने लावले व जोपासले याची साक्ष मिळेल.
कॉँग्रेसचे रोपटे
भाई जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात प्रतिगामी शक्ती वाढीस लागण्यास कॉँग्रेस जबाबदार आहे, अशी टीका केली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत ते म्हणाले, प्रतिगामी शक्तींना कॉँग्रेसने पाठीशी घातले. इतिहासात पाहिले तर हे रोपटे कॉँग्रेसने लावले व जोपासले याची साक्ष मिळेल.