मटका छापणाऱ्या वृत्तपत्रांवर कारवाई
By admin | Published: October 26, 2015 12:46 AM2015-10-26T00:46:06+5:302015-10-26T00:50:00+5:30
राम शिंदे : राज्यातून मटका-जुगार हद्दपार करण्याचा गृहविभागाचा निर्णय
कोल्हापूर : राज्यातून मटका-जुगारासह अवैध धंदे हद्दपार करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू राहतील, त्या ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच मटका छापणाऱ्या वृत्तपत्रांवर त्यांच्या मुद्रणस्वातंत्र्यावर बाधा येणार नाही, याचा विचार करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनास दिले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री प्रा. शिंदे हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनास दिले आहेत. त्यातूनही कोठे अवैध धंदे सुरू राहतील तर त्या जिल्ह्याच्या पोलीसप्रमुखासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. राज्यातून मटका-जुगार हद्दपार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मटका छापणाऱ्या वृत्तपत्रांवरही त्यांच्या मुद्रणस्वातंत्र्यावर बाधा येणार नाही, याचा विचार करून कारवाई करण्याचे आदेशही पोलीस प्रशासनास दिले असल्याचे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
दादांनी दिलेले उमेदवार स्वच्छ
महापालिका निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीमध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेले काही उमेदवार गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे उमेदवार तुम्हाला कसे चालतात? या पत्रकारांच्या प्रश्नावर प्रा. शिंदे यांनी दादांनी स्वच्छ व चारित्र्यसंपन्न उमेदवारच निवडले असल्याचे सांगितले.
डिसेंबरमध्ये पोलीस भरती
पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी डिसेंबरमध्ये २० हजार पोलीस शिपाई पदांसाठी भरती होत आहे. ती पाच टप्प्यांत होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
पानसरे हत्येच्या तपासासंदर्भात मौन
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात माहिती विचारली असता प्रा. शिंदे यांनी, तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यावर काही भाष्य करणे उचित ठरणार नाही, असे सांगितले.
साहित्यिकांनी पुरस्कार परत
करू नयेत; सूचना कराव्यात
शासनाने दिलेले पुरस्कार साहित्यिक परत
करू लागले आहेत. ते त्यांनी परत करू नयेत.
काही सूचना असतील तर त्या कराव्यात,
त्यामध्ये सुधारणा केली जाईल, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.