संजय भोसले यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:28 AM2021-08-19T04:28:20+5:302021-08-19T04:28:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्यात सहभागी असल्याबाबत संजय भोसले यांच्याविरोधातील तक्रारीनुसार चौकशी सुरू आहे. जर ते दोषी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्यात सहभागी असल्याबाबत संजय भोसले यांच्याविरोधातील तक्रारीनुसार चौकशी सुरू आहे. जर ते दोषी असतील, तर कारवाई निश्चित केली जाईल. तसेच त्यांच्या बदली आणि बढतीमध्येही काही चुका झाल्या असतील, तर त्यांना मूळ पदावर पाठविले जाईल. कोणाला पाठीशी घातले जाणार नाही, असे प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी सांगितले.
महानगरपालिकेतील घरफाळा घोटाळा, तसेच बदली आणि बढती यावरून माजी उपमहापौर भूपाल शेटे व रचना, कार्यपध्दती अधिकारी तथा अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. संजय भोसले दोषी असल्याचा दावा भूपाल शेटे करत आहेत, तर आपण निर्दोष असल्याचे भोसले ठासून सांगत आहेत. त्यामुळे कोणाचा दावा खरा आहे, याबाबत महापालिका वर्तुळात कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.
संजय भोसले यांना केएमटीकडे पुन्हा का पाठवू नये, अशी नोटीस देण्यात आली होती. त्यावर त्यांचा खुलासा प्राप्त झालेला आहे. खुलासा तपासून पुढील कारवाई आठ दिवसात केली जाईल, असे प्रशासक बलकवडे यांनी सांगितले. घोटाळा, बदली व बढतीप्रकरणी प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांवर कोणाचाही दबाव नाही, असा खुलासा करतानाच जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. संबंधित व्यक्तीला नैसर्गिक न्याय दिला पाहिजे, म्हणून निर्णय घेण्यास विलंब होत आहे, असे त्यांनी सांगितले.