चिथावणी देणाऱ्या रिल्स करताय?, फाळकूटदादांच्या विरोधात कोल्हापूर पोलिसांचा ॲक्शन प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 01:34 PM2024-06-17T13:34:12+5:302024-06-17T13:35:21+5:30
गुंडगिरी रोखण्यासाठी झोपडपट्ट्यांवर नजर, रिल्सची तपासणी करून कारवाई
कोल्हापूर : शहरात वाढणारी फाळकूटदादांची दहशत आणि गुंडांच्या टोळ्यांमधील संघर्ष रोखण्यासाठी पोलिसांनी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. झोपडपट्ट्यांमधील अवैध धंद्यांचे उच्चाटन करून गुंडांना मिळणारी आर्थिक रसद तोडली जाणार आहे. तसेच रिल्समधून चिथावणी देणाऱ्या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई होणार आहे. प्रतिबंधात्मक कारवायांसह झोपडपट्टीदादा विरोधी कायद्यानुसार कारवायांची व्याप्ती वाढविली जाणार आहे, अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिली.
अवघ्या विशीतील तरुणांच्या टोळ्या आणि त्यांच्या वाढत्या गुंडगिरीमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्यानंतरही त्यांचे कारनामे थांबलेले नाहीत. उलट गुन्हे दाखल झाल्याचे मिरवत ते दहशत वाढवीत आहेत. त्यामुळे गुंडगिरी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी ॲक्शन प्लॅन केला असून, तातडीने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
सराईत गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांना हद्दपार, तडीपार, स्थानबद्ध करणे, एमपीडीए म्हणजेच झोपडपट्टीदादा विरोधी कायद्यानुसार गुंडांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करणे, अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याचे नियोजन पोलिसांनी केले आहे. या कारवाईतून फाळकूटदादांना गुंडगिरीला लगाम लागेल, असा विश्वास उपअधीक्षक अजित टिके यांनी व्यक्त केली.
झोपडपट्ट्यांमध्ये वाढली गुन्हेगारी
राजेंद्रनगर, वारे वसाहत, सुधाकर जोशी नगर, यादवनगर, सदर बाजार, ताराराणी चौक, टेंबलाई नाका, कनाननगर परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये फाळकूटदादांचे अड्डे आहेत. यात काही उपनगरे आणि आसपासच्या गावातील तरुणांचाही समावेश आहे. गरिबी, शिक्षणाचा अभाव, अवैध धंद्यांचा विळखा, कमी श्रमात पैसा मिळविण्याचा हव्यास आणि राजकीय आश्रय यातून झोपडपट्ट्यांमधील गुन्हेगारी वाढत आहे. याला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
रिल्समुळे वाढली डोकेदुखी
गुंडांच्या टोळ्या रिल्समधून एकमेकांना आव्हान देतात. यातून भडका उडून खुनी हल्ले होत आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी संशयास्पद रिल्स आढळताच संबंधित तरुणांना उचलून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याचे मोबाइल आणि दुचाकी जप्त करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुंडगिरीचे उदात्तीकरण
खून झालेल्या गुंडांचे फलक शहरात ठिकठिकाणी लागतात. अनेकांच्या स्टेटसला त्याचे फोटो असतात. रिल्सद्वारे व्हिडिओ व्हायरल होतात. यातून गुंडगिरीचे उदात्तीकरण होत आहे. सुधाकर जोशी नगर येथे गुरुवारी खून झालेला गुन्हेगार सुजल कांबळे यांचे फलक वारे वसाहत परिसरात लागले आहेत. यापूर्वी राजेंद्रनगर परिसरात गुंडांचे फलक झळकले होते.
पालकांना देणार समज
आक्षेपार्ह रिल्स तयार करणारे, गुन्हेगारी टोळ्यांशी लागेबांधे असलेले, गुंडांच्या समर्थनार्थ फिरणाऱ्या तरुणांना पकडून त्यांच्याकडून वर्तनात सुधारणा करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. तसेच त्यांच्या पालकांना बोलवून समज दिली जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुन्हेगारी रोखण्यासाठी अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासह गुंडांवर कठोर कारवाया करण्याच्या सूचना शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या आहेत. येत्या महिनाभरात याचे परिणाम दिसतील. - अजित टिके - शहर पोलिस उपअधीक्षक