वर्षा पर्यटनासाठी कृती आराखडा
By admin | Published: June 15, 2017 12:01 AM2017-06-15T00:01:52+5:302017-06-15T00:01:52+5:30
वर्षा पर्यटनासाठी कृती आराखडा
महादेव भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबोली : आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी दरवर्षीप्रमाणे लाखो पर्यटक येतात. या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली असून, सावंतवाडी पोलिसांनी आंबोली वर्षा पर्यटनासाठी नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याप्रमाणे स्थानिक पोलिसांबरोबरच मुख्यालयातून पोलिसांची अतिरिक्त कुमक शनिवार व रविवारी बंदोबस्तासाठी ठेवण्यात येणार आहे. आंबोली वर्षा पर्यटनाचे नियोजन कसे करायचे याबाबत पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व तशा सूचनाही दिल्या आहेत.
आंबोली येथे पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गोवा, बेळगाव, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्गमधून लाखो पर्यटक येत असतात. शनिवार व रविवारी तर आंबोली पर्यटकांनी फुलून गेलेली असते. अगदी हाऊसफुल्लच असते. आंबोलीपासून मुख्य धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पर्यटकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे या पर्यटकांना काबूत ठेवण्यासाठी अनेक वेळा पोलिसांना सौम्य असा लाठीमारही करावा लागतो. त्यामुळे पोलीस वर्षा पर्यटनाच्या अगोदरच व्यूहरचना आखत असतात. त्याप्रमाणे यावर्षीही पोलिसांनी वर्षा पर्यटनाचा आराखडा तयार केला आहे.
पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सहकारी पोलीस कर्मचारी यांच्यासोबत आंबोलीला भेट दिली व तेथील हॉटेल व्यावसायिक व पोलीस मित्रांसोबत बैठक घेतली आणि त्यांना वर्षा पर्यटन कसे सुरळीत होईल याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच मद्यपी पर्यटकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या पर्यटकांपासून इतरांना त्रास होणार नाही याची पोलीस मित्रांनी दक्षता घ्यावी, असे धनावडे यांनी सांगितले असून, पोलीस मित्रही वर्षा पर्यटनाच्या गर्दीत काम करणार आहेत.
आंबोलीत दरवर्षी मुख्यालयात विशेष पोलीस बंदोबस्त येतो. यावर्षीही त्याच प्रकारे बंदोबस्त मागविण्यात येणार आहे. हा बंदोबस्त शनिवार व रविवारी विशेष जास्त अतिरिक्त कुमक असणार आहे. त्यांच्यासोबत अधिकारीही असणार आहेत. आंबोलीतील मुख्य धबधब्यावर विशेष पर्यटक असतात. त्याचबरोबर कावळेसाद व महादेव गड येथेही पर्यटकांची ये-जा असते. त्यामुळे तेथेही पोलिसांची नजर राहणार आहे.
वर्षा पर्यटन हे विशेषत: शनिवार व रविवारी असते. त्या दिवशीच मोठ्या प्रमाणात पर्यटक हा आंबोलीला येत असतो. त्यामुळे आंबोलीमार्गे जाणारी व येणारी अवजड वाहतूक खाली दाणोलीत वर आंबोलीत उभी करून ठेवण्यात येणार असून, पूर्ण पर्यटक ओसरले की वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षताही घेण्यात येणार आहे. या काळात आंबोली दूरक्षेत्रावर वाढीव पोलीस बंदोबस्त असणार आहे. तसेच इतर दिवशीही पर्यटक येत असतात. त्यामुळे मुख्य धबधबा परिसरात एक-दोन पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात येणार आहेत.