रंकाळा विकासाचा ‘अॅक्शन प्लॅन’ कागदावरच
By admin | Published: December 27, 2014 12:09 AM2014-12-27T00:09:18+5:302014-12-27T00:19:24+5:30
नेते, प्रशासनाची बघ्याची भूमिका : तत्काळ काम सुरू होणे गरजेचे
कोल्हापूर : रंकाळ्यासाठी १०० कोटींचा निधी द्या, अशी मागणी वर्षभरापूर्वी शासनाकडे करून महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी बघ्याच्या भूमिकेत आहेत. कामे पूर्ण न करताच पहिल्या टप्प्यातील खर्चाचा हिशेबाचा ताळेबंद मात्र प्रशासनाने तयार केला आहे.
रंकाळ्याच्या ढासळणाऱ्या संरक्षक भिंती, खराब रस्त्यांमुळे पसरलेले धुळीचे साम्राज्य, नावालाच असलेले बगीचे, कागदावरचाच नौकाविहार, दररोज मिसळणाऱ्या दहा एमएलडी मैलामिश्रित सांडपाण्यामुळे काळे-निळे होणारे पाणी, आदी समस्यांनी रंकाळ्याला घेरले आहे. मात्र, रंकाळ्याची समस्यांच्या गर्तेतून सोडवणूक कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर कोणाक डेच नाही.
केंदाळ समूळ नष्ट करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करून विव्हिल किडे सोडण्यात आले; पण ते कमी झाली नाही. आता पुन्हा केंदाळाचे दुखणे वर तोंड काढत आहे. बोट खरेदी करण्याकरिता ४५ लाखांची तरतूद केली; पण गेल्या तीन वर्षांत अद्याप ती खरेदी केली नाही. यापूर्वी आणलेल्या बोटी चोरीला गेल्या, असे सांगून प्रशासन हात वर करीत आहे. ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करण्यापलीकडे प्रशासनाची मजल गेलेली नाही.
इराणी खणीचा गाळ काढून ते पाणी पाईपमध्ये सोडल्याने गाळ अडकून ड्रेनेज लाईनची क्षमता कमी झाल्याची चर्चा आहे. मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे रंकाळ्याच्या पाण्याचा रंग बदलू लागला आहे.
अतिरिक्त झालेले पाणी बाहेर जाण्यासाठी असणारे व्हॉल्व्ह पुन्हा सुरू करून रंकाळ्यातील संपूर्ण पाणी उपसून गाळ काढण्याची गरज आहे. तटबंदीचे वयोमान संपल्याने तिच्या संपूर्ण मजबुतीकरणाची गरज आहे. नैसर्गिक पुनर्भरणासाठी नाशिकच्या धरण सुरक्षा संस्थेच्या तज्ज्ञांची मदत घेऊन तत्काळ निधीची उपलब्धता करून काम सुरु करणे गरजेचे आहे.
रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी बंद करणे गरजेचे आहे. येत्या २४ तासांत हे मिसळणारे पाणी बंद झाले तरी रंकाळ्याचे नैसर्गिक पुनर्भरण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. नैसर्गिक पुनर्भरण झाल्याखेरीज रंकाळ्याचे दुखणे कमी होणार नाही. प्रशासकीय उदासीनताच रंकाळ्याच्या मुळावर उठली आहे.
- उदय गायकवाड
(पर्यावरण अभ्यासक)
केंद्राला १०४ कोटींचा आराखडा सादर : धनंजय महाडिक
कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाचा १०४ कोटी रुपयांचा विकास आराखडा केंद्राला सादर केला आहे. त्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती व रंकाळा प्रेमींच्यावतीने आज, शुक्रवारी सायंकाळी रंकाळा तलाव पदपथ उद्यान येथे आयोजित ‘रंकाळा दिवस’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
रंकाळा उद्यान येथे झालेल्या या कार्यक्रमात रंकाळा येथे झाडांची लागवड व संवर्धन व स्वच्छता मोहिमेत योगदान देणाऱ्या श्रीकांत कदम, सुभाष हराळे, गुंडोपंत जितकर, अजित मोरे, जमीर मुजावर, भीमराव तिरमारे यांचा रोप देऊन खासदार महाडिक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सायंकाळी सुनील सुतार, सुरेश शुक्ल यांंचा ‘स्वरनिनाद’ निर्मित ‘शब्दसुरांच्या झुल्यावर’ हा गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. राजेंद्र पाटील यांनी स्वागत, तर चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी संजय शिंदे, अभय देशपांडे, पृथ्वीराज पाटील, रवींद्र वडगावकर, अजित राऊत, अनिल काकडे, विनायक भोसले, अॅड. अजित चव्हाण, जगदीश रांगोळे, सागर नालंग, रवी तांबट, पवन जमादार, सुधीर भांबुरे, विकास जाधव, आदी उपस्थित होते.