नियम धाब्यावर, मास्क न वापरणाऱ्या कोडोलीतील सहा दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 03:17 PM2020-09-24T15:17:48+5:302020-09-24T15:27:38+5:30
कोडोली ता पन्हाळा येथील मुख्य मार्गावरील असलेल्या दुकानामध्ये कोरोना संसर्गाबाबत असलेले नियम धाब्यावर बसवणाऱ्या सहा दुकानदारावर पन्हाळयाचे तहसिलदार रमेश शेडगे यांच्या पथकाने अचानक छापा मारून कारवाई केली.
कोडोली : कोडोली ता पन्हाळा येथील मुख्य मार्गावरील असलेल्या दुकानामध्ये कोरोना संसर्गाबाबत असलेले नियम धाब्यावर बसवणाऱ्या सहा दुकानदारावर पन्हाळयाचे तहसिलदार रमेश शेडगे यांच्या पथकाने अचानक छापा मारून कारवाई केली.
यामध्ये दुकानदाराने मास्क न वापरणे , ग्राहकांच्यामध्ये सोशल डिस्टन्स नियमाचे पालन न करणे, खाद्यपदार्थाची विक्री पार्सल मार्फत न करता दुकानात बसून खाणेस देणे या कारणास्तव या सहा दुकानानांवर कारवाई केली. या कारवाईत दंड म्हणून दुकाने सिल करून दोन दिवस बंद ठेवणेच्या सूचना ही दिल्या आहे.
माझे कुंटुब माझी जबाबदारी या योजनेचा आढावा घेणेसाठी कोडोली येथे तहसिलदार व गटविकास अधिकारी यांची कोडोली येथे बुधवारी दुपारी बैठक आयोजित करणेत आली होती. बैठक संपल्यानंतर तहसिलदर व गटविकास अधिकारी यांनी अचानक मार्केट मध्ये भेट दिली.
यावेळी अनेक दुकाना मध्ये मास्क न वापरणे , ग्राहकांच्यामध्ये सोशल डिस्टन्स नियमाचे पालन न करणे, खाद्यपदार्थाची विक्री पार्सल मार्फत न करता दुकानात बसून खाद्यपदार्थ खाणेस देणे असे दिसून आले. ही कारवाई सायकांळी साडेपाच ते सव्वासहा या वेळेत सर्वोदय चौक ते शिवाजी चौक या मुख्य रस्त्यावरील दुकानावऱ करणेत आली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात असताना ही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोडोलीत साधारण दोनशे पेक्षा जादा रुग्ण बाधित झाले असून पंधरा जनांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणू बाबत भितीचे वातावरणात असतानाही व्यापारी वर्गासह नागरिकही गांभीर्याने बघत नाहीत.
लॉक डाऊन संपून तीन दिवस झाले असताना नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. वास्तविक कोरोना रोखण्यासाठी शासनाने तयार केलेल्या नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा फैलाव रोखण्यास वेळ लागणार नाही. या साठी व्यापारी वर्गाने सहकार्य करणे गरजेचे झाले आहे.
यावेळी गट विकास अधिकारी तुलसीदास शिंदे, मंडळ अधिकारी अभिजित पोवार, तलाठी अनिल पोवार, कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सुरज बनसोडे, कोडोली ग्रामपंचायतीचे प्रशासक राजेंद्र तलपे, ग्रामसेवक ए वाय कदम, कोतवाल सिराज आंबी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बाबा पाटील, उपाध्यक्ष सुरज शहा, कोडोली ग्रामपंचायतीचे अधिकारी कर्मचारी सहभागी होते.
कारवाई केलेली दुकाने
जमीर एटंरप्राईजस , पायल जनरल स्टोअर्स , अय्यंगार बेगलोर बेकारी, दत्त राज फोटो स्टुडिओ, अयोध्या एन्टरप्राईजेस, महेश जनरल स्टोअर्स .