आयुक्तांशी हुज्जत घालणाऱ्या ‘सभापतीं’वर कारवाई करावी
By admin | Published: September 25, 2016 01:24 AM2016-09-25T01:24:13+5:302016-09-25T01:24:13+5:30
सुनील कदम : कक्षातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी
कोल्हापूर : महानगरपालिकेत आयुक्तांशी हमरीतुमरी करण्याचा स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांच्याकडून घडलेला प्रकार निंदनीय आहे. आयुक्त कार्यालयात घडलेल्या प्रकाराबाबतचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, विभागीय सचिव, विशेष पोलिस महानिरीक्षक व पोलिस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याची माहिती माजी महापौर व ताराराणी आघाडीचे नेते सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडून अधिकाऱ्यांवर दंडुकशाही सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.
महापालिकेत शुक्रवारी आयुक्त कक्षात स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना दमदाटी करून हमरीतुमरीचा प्रकार केल्याचे वृत्त घडल्याबाबत सुनील कदम यांनी निषेध व्यक्त केला. ते म्हणाले, आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी सभापती मुरलीधर जाधव यांनी हुज्जत घातली. त्यावेळी आयुक्तांनी सभापती जाधव यांना ‘गेट आऊट’ म्हणून कक्षातून बाहेर काढले.
असा प्रकार कोल्हापूरच्या दृष्टीने लाजिरवाणा आहे. सभापतींनी अधिकाऱ्यांच्या कक्षात न जाता कामाची तक्रार महापौरांकडे करणे अपेक्षित आहे. सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीमुळे चांगले अधिकारी सेवानिवृत्ती घेत आहेत. यापूर्वी अधिकाऱ्यांची खुर्ची उचलणे, अधिकाऱ्यांचे अपहरण करणे, अधिकाऱ्यांच्या कक्षाला कुलूप लावणे, दमदाटी करणे, आदी प्रकार घडूनही त्याबाबत कोणतीच कारवाई केलेली नाही.
अधिकाऱ्यांना होत असलेल्या दादागिरीमुळे कोल्हापूर शहराची प्रतिमा राज्यात डागाळत आहे, असाही आरोप त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या या दंडुकशाहीबद्दल ताराराणी-भाजप आघाडी संघर्ष करीत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, विभागीय सचिव यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे. आयुक्तांच्या कक्षात घडलेल्या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्यांच्यावर कारवाईची मागणी विशेष पोलिस महानिरीक्षक व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याचेही कदम यांनी सांगितले.
यावेळी विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, शेखर कुसाळे, अशिष ढवळे, किरण शिराळे, ईश्वर परमार, किरण नकाते, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सत्ताधारी नेत्यांचे आरोप
दिशाभूल करणारे
सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या दोन नेत्यांनी शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन ताराराणी-भाजप आघाडीच्या सदस्यांची कामे प्रशासक करतात असे आरोप करणे चुकीचे आहे. आम्ही कोणतीही कामे बेकायदेशीर केलेली नाहीत. केली असतील ती त्यांनी दाखवून द्यावीत. दोन जबाबदार माजी मंत्र्यांनी असे दिशाभूल करणारे वक्तव्य करणे चुकीचे आहे.
काय घडले आयुक्त कार्यालयात?
स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव शुक्रवारी दुपारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्या कार्यालयात गेले होते. शहरातील स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटची काही कामे रद्द झाली असून, त्याचा निधी शिल्लक राहिला आहे. हा निधी अन्य विकासकामांकडे वळविण्यात येणार आहे. प्रशासनाने कोणती कामे करायची याचा प्रस्ताव करून तो मंजुरीला दिला होता. तो मंजूरही झाला, परंतु सर्व निधी माझ्या भागातच खर्च करा, असा आग्रह जाधव यांनी धरला होता. परंतु आयुक्तांनी, जर तसे करायचे असेल तर प्रशासनाच्या प्रस्तावास उपसूचना देऊन बदल करावा. दिलेला प्रस्ताव मी बदलणार नाही, असे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या जाधव यांनी आयुक्तांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी माझ्या कार्यालयात येऊन मला मोठ्याने बोलण्याचे कारण नाही. तुम्ही कार्यालयातून निघून जा, अशा शब्दांत आयुक्तांनी त्यांना बजावले. दोघांमधील वाद विकोपाला गेला. दोघेही बोलणे थांबवत नाहीत म्हटल्यावर शेवटी लेखापाल संजय सरनाईक यांनी प्रसंग ओळखून जाधव यांना समजावत, शांत होण्याची विनंती करीत बाहेर नेले.