रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी : क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 07:20 PM2020-07-25T19:20:04+5:302020-07-25T19:25:57+5:30
जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेऊनही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांना समज द्यावी, अशा सूचना शनिवारी झालेल्या बैठकीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी संबंधितांना दिल्या.
कोल्हापूर : बेडअभावी कोरोना रुग्णाचा सीपीआर रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याने प्रशासनाचा ढिसाळ कारभार उघड होत आहे. अशा प्रकारे उपचारांअभावी आजतागायत तीन रुग्ण दगावले असून, या रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेऊनही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांना समज द्यावी, अशा सूचना शनिवारी झालेल्या बैठकीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी संबंधितांना दिल्या.
बेड शिल्लक नाही? म्हणून कोरोनाग्रस्त रुग्णाला कसे काय सांगितले जाते? शिल्लक नसल्यास त्या रुग्णास इतर रुग्णालयात का दाखल करून उपचार करण्यात आले नाही? असे प्रश्न विचारत रुग्ण दगावला त्या दिवशी आठ बेड शिल्लक असल्याचे क्षीरसागर यांनी निदर्शनास आणून दिले.
स्थलांतरित लोकांना परस्पर बनावट होम क्वारंटाईनचे शिक्के मारून तपासणी न करताच घरी पाठविण्यात आले. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली. बनावट शिक्के मारणाऱ्या दलालांच्या टोळीवर कारवाई करावी. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट रुग्णालयांना घालून दिलेल्या नियमावलीनुसार कोणती रुग्णालये अंमलबजावणी करतात आणि कोणती करत नाहीत याचा अहवाल द्या, जी रुग्णालये शासनाची नियमावली पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांनी रुग्णाच्या मृत्यूबाबत चौकशी करून अहवाल दोन दिवसांत सादर करण्याची ग्वाही दिली. यामध्ये कोणी दोषी आढळत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले.
सीपीआरची मर्यादा वाढवतोय
सीपीआर प्रशासन कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची आपली मर्यादा वाढवत असून त्याप्रमाणे यंत्रणाही सुसज्ज होत आहे. परंतु, मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने प्रशासन हतबल आहे. यातून निश्चितच मार्ग काढून कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेवू, असे डॉ. घोरपडे यांनी सांगितले. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, डॉ.सुभास नागरे, डॉ. सांगरूळकर, ॲपल हॉस्पिटलच्या डॉ. गीता आवटे, डायमंड हॉस्पिटलचे डॉ. साईप्रसाद, आदी उपस्थित होते.
जादा पैसे आकारल्यास संपर्क साधा - क्षीरसागर
शासनाची नियमावली डावलून कोरोना उपचारासाठी रुग्णाकडून जादा पैसे आकारणाऱ्या रुग्णालयांची गाठ शिवसेनेशी आहे. आर्थिक लुबाडणूक झाली असल्यास रुग्णांनी, नातेवाइकांनी शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन. क्षीरसागर यांनी यावेळी केले.