निकालानंतर हुल्लडबाजी केल्यास कारवाई जिल्हा पोलीसप्रमुख : कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नजर
By admin | Published: May 16, 2014 12:37 AM2014-05-16T00:37:07+5:302014-05-16T00:41:14+5:30
कोल्हापूर : लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणूक मतमोजणीच्या निकालानंतर हुल्लडबाजी करणार्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
कोल्हापूर : लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणूक मतमोजणीच्या निकालानंतर हुल्लडबाजी करणार्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कार्यकर्त्यांनी निकालानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. कायद्याचे पालन न करणार्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दिला आहे. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील निवडणुकीची मतमोजणी उद्या, शुक्रवारी शासकीय तंत्रनिकेतन परिसरात होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात ७०० पोलीस व राज्य राखीव दलाचे १०० जवान लक्ष ठेवून असतील. मतमोजणी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. येथील प्रत्येक व्यक्तीची हालचाल कॅमेराबद्ध होणार आहे. साध्या वेशातही पोलिसांची पथके या परिसरात लक्ष ठेवून असणार आहेत. हुल्लडबाजी करणार्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिसांना दिले आहेत. काँग्रेस, महायुती, आप, शेकाप, अपक्ष, आदी पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची वेगवेगळी सोय करण्यात आली आहे. नागरिकांची कोणत्याही प्रकारे हेळसांड होऊ नये, यासाठी शासकीय तंत्रनिकेतन मतमोजणी परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. पहाटे सहा ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या परिसरात मी स्वत: लक्ष ठेवून असणार आहे, असेही डॉ. शर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)