अभयारण्य क्षेत्रात पार्टी करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:32 AM2020-12-30T04:32:50+5:302020-12-30T04:32:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राधानगरी तसेच चांदोली अभयारण्य परिसर आज, दि. ३० डिसेंबर ते १ जानेवारी २०२१ पर्यंत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राधानगरी तसेच चांदोली अभयारण्य परिसर आज, दि. ३० डिसेंबर ते १ जानेवारी २०२१ पर्यंत तीन दिवस पर्यटकांसाठी बंद राहणार असून या परिसरात जेवण करणाऱ्यांवर वनविभाग सक्त कारवाई करणार आहे.
कोरोनामुळे राज्यातील सर्व पर्यटनस्थळे तसेच वनविभागाच्या अखत्यारीतील अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, पर्यटनस्थळे बंद होती. मात्र, नोव्हेंबर महिन्यात काही ठिकाणे अंशत: खुली झाली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यातही काही दिवस अभयारण्ये आणि पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी मोफत खुली करण्यात आली होती. त्यामध्ये राधानगरी अभयारण्य आणि चांदोली अभयारण्य परिसराचा समावेश होता.
दहा महिने घरातच बंद असलेल्या नागरिकांनी विविध पर्यटनस्थळांकडे धाव घेतली होती. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर पर्यटकांचा ओढा राज्यातील पर्यटनस्थळांकडे वाढला होता. वनविभागाच्या राधानगरी आणि चांदोली, तिलारी, कोयना यासारख्या निसर्गरम्य परिसरातील पर्यटन वाढले होते.
आता सुरक्षेच्या कारणासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वनविभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये आणि पर्यटनस्थळे, धरणे परिसर ३०, ३१ डिसेंबर २०२० आणि १ जानेवारी २०२१ असे तीन दिवस पर्यटकांसाठी बंद करण्याचे आदेश वनविभागाने दिले आहेत. इतकेच नव्हे तर या परिसरात जेवण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही वनविभागाने दिला आहे. २ जानेवारीपासून वनविभागाच्या अखत्यारीतील सर्व पर्यटनस्थळे पुन्हा पूर्ववत सुरू होतील, असे वनविभागाने म्हटले आहे.
(संदीप आडनाईक)