सहकारी संस्थांवरील कारवाई ‘जैसे थे’
By admin | Published: July 22, 2016 11:03 PM2016-07-22T23:03:47+5:302016-07-23T00:18:25+5:30
हातकणंगले तालुका : अर्थसहाय्य घेऊन संस्था बंद पाडणाऱ्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष
दत्ता बीडकर --हातकणंगले तालुक्यातील ३६३ सहकारी संस्थांवर अवसायक नेमून तब्बल पाच महिने उलटले तरी अवसायकाकडून अद्याप या संस्थांचे लेखापरीक्षण, येणी-देणी तपासून नोंदणी रद्दची प्रक्रिया रखडली आहे. ९00 कोटी रुपये शासन अनुदान आणि राष्ट्रीय सहकार विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडून अर्थसहाय्य प्राप्त केलेल्या संस्थांचा या अवसायक यादींमध्ये समावेश आहे. शासन अनुदान आणि सहकार विकास निगमकडून कोट्यवधीचे अर्थसहाय्य घेऊन संस्था बंद पाडणाऱ्या संस्थाचालकांवर सहकार विभाग कोणती कारवाई करणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
अवसायक संस्थांबाबत आणि त्यांच्यावरील कारवाईबाबत उपनिबंधक यांच्याकडे चौकशी केली असता, अनुदानप्राप्त यंत्रमाग संस्थांचे मुख्यालय सोलापूर येथे आहे, तर मागासवर्गीय औद्योगिक संस्थांवर समाजकल्याण विभागाचे नियंत्रण असल्याने त्यांच्याकडूनच कारवाई होत असल्याचे मत व्यक्त केले.
तालुक्यातील २७३३ सहकारी संस्थांपैकी १६६४ संस्थांचा ठावठिकाणा सापडत नाही. संस्था नोंदणी पत्त्यावर मिळून येत नाही. म्हणून सहकार विभागाने २३ नोव्हेंबर २0१५ रोजी दैनिकामध्ये जाहीर प्रकटन केले आणि पंधरा दिवसांत संस्था चालू असल्याचे पुरावे सहकार कार्यालयामध्ये सादर करण्याचे आवाहन केले. यानंतर पुन्हा एकदा सहकार विभागाने ११७८ संस्थांना १४ जानेवारी २0१६ रोजी दुसऱ्यांदा मध्यंतरीय आदेश काढून एक महिना मुदत देऊन संस्थांनी आपले लेखापरीक्षण अहवाल, बँक खाते उतारे हजर करून संस्था सुरू असल्याचे पुरावे सादर करण्यासाठी मुदत दिली. तरीही संस्थांचालकांनी उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले कार्यालयाकडे कोणत्याही प्रकारचे दप्तर हजर केले नाही. म्हणून उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले यांच्याकडून पहिल्या टप्प्यात ३६३ संस्थांवर अवसायक नियुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. संस्थांवर अवसायक नेमून तब्बल पाच महिने उलटले तरी अवसायकाकडून अद्याप या संस्थांचे लेखापरीक्षण करून अहवाल उपनिबंधकांकडे सादर केले नाहीत. तसेच शासनाकडून पंधरा दिवसांत अवसायक संस्थेची सर्वसाधारण सभा घेऊन या सभेमध्ये संस्थेचा संपूर्ण लेखाजोखा मांडून संस्थेची ३१ मार्च २0१६ अखेर नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश होते. हे आदेशही या अवसायकांनी बासनात गुंडाळून ठेवल्याचे सिद्ध झाले आहे.
बोजा चढविणार : बोगस संस्थाचालकांचे धाबे दणाणले
शासनाकडून आणि राष्ट्रीय सहकार विकास निगम नवी दिल्ली यांच्याकडून तालुक्यामध्ये सर्वाधिक निधी आला आहे. हातकणंगले तालुका हा निधी खेचून आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहे. अवसायक संस्थांचाही यामध्ये समावेश आहे. या संस्थांचालकांवर कोणती कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
शासन अनुदानाची रक्कम आणि राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून निधी उचलून संस्थांना कुलूप लावून नामानिराळे राहणाऱ्या संस्थाचालकांचा आणि त्यांच्या बोगस संचालक मंडळांचा शोध अवसायक करीत आहेत. बोगस संस्थाचालक आणि बोगस संचालक मंडळाच्या स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्तावर अर्थसहाय्य उचल केल्याचे बोजे चढविण्यात येणार असल्याने बोगस संस्थाधारकांचे धाबे दणाणले आहेत.