कारवाई ठाण्यात, आनंद कोल्हापूरात
By admin | Published: December 27, 2014 12:45 AM2014-12-27T00:45:13+5:302014-12-27T00:48:30+5:30
लाच घेताना ‘बाबा’ जाळ्यात : सहीचे अलिखित दरपत्रकच
कोल्हापूर : एम. फिल., पीएच. डी.ची वेतनवाढ, मेडिकलची बिले अथवा अन्य कोणतेही काम असेल तर त्यासाठी दरपत्रकच लावलेल्या व कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात पुर्वी काम केलल्या एका माजी अधिकाऱ्यास अटक झाल्याने येथील प्राध्यापकांनी आनंद व्यक्त केला. या अधिकाऱ्यास काल, गुरुवारी ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वेतननिश्चितीसाठी वीस हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याचे वृत्त समजताच शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापकांनी समाधान व्यक्त केले.
विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालय येथील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कारभारामुळे नेहमीच चर्चेत आहे. पारदर्शक कामकाज होत नसल्याने प्राध्यापक, प्राचार्य संघटनांकडून वारंवार याठिकाणी आंदोलने होतात. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी याठिकाणी कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याने काम करण्याचे अलिखित दरपत्रकच तयार केले होते. एम. फिल., पीएच. डी.ची वेतनवाढ, मेडिकलची बिले, सेवानिवृत्तीनंतरचा फंड, स्थाननिश्चिती अशा प्रत्येक कामासाठी विशेष स्वरूपातील ‘अर्थ’ पूर्ण व्यवहार झाल्याशिवाय प्राध्यापक, प्राचार्यांची ‘फाईल’ पुढे सरकतच नव्हती, असे अनुभव काही प्राध्यापकांनी स्वत:हून फोन करून सांगितले. सेवानिवृत्त झालेल्या पण, फंड, आदी लाभांसाठी तसेच नव्याने रुजू होऊन वेतन सुरू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्राध्यापकांच्या मदतीवर संबंधित अधिकाऱ्याने लग्नाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केल्याचे काही प्राध्यापकांनी सांगितले. त्यांच्या कारभाराचा त्रास वाढल्याने त्याला हटविण्यासाठी विद्यापीठ शिक्षक संघ आणि प्राचार्य संघटनेने आंदोलनाची मोट बांधली. त्याला बळी पडण्याआधीच त्यांनी येथून बदली करून घेतली होती.
किती ही हाव...
ज्यांना लाच घेताना पकडले, त्यांची पत्नीही कोल्हापुरातील महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. असे असतानाही पैसे मिळाल्याशिवाय सहीसाठी ते पेनच उचलत नव्हते असे प्राध्यापकांनी सांगितले.