बाराशे वाहनचालकांवर कारवाई : शहरात ट्रॅफिक ड्राईव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:16 AM2018-03-13T01:16:09+5:302018-03-13T01:16:09+5:30
कोल्हापूर : शहरातील चौकांत, नाक्यांवर व महामार्गावर सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी एक व सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत पोलीस बंदोबस्त ठेवला.
कोल्हापूर : शहरातील चौकांत, नाक्यांवर व महामार्गावर सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी एक व सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत पोलीस बंदोबस्त ठेवला. यावेळी वाहनांच्या तपासणीबरोबरच चालक मद्यप्राशन करून गाडी चालवितात काय, हे तपासण्यासाठी चालकाची ब्रेथ अॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली गेली. या मोहिमेमध्ये सुमारे १२०० नियमबाह्य वाहनचालकांवर कारवाई करत २ लाख ४० हजार रुपये दंडाची वसुली केली. सोमवार ते बुधवार असे तीन दिवस हे ‘ट्रॅफिक ड्राईव्ह’ चालणार आहे.
घरफोड्या, चेन स्नॅचिंग, लूटमारीसह दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आम्ही सुरक्षित नसल्याच्या काही तोंडी तक्रारी नागरिकांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे केल्या. त्यांनी पुन्हा ‘ट्रॅफिक ड्राईव्ह’ घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना दिले. त्यानुसार शहरातील पाच पोलीस निरीक्षक, १०० पोलीस कर्मचाºयांची फौज सोमवारी रस्त्यावर उतरली. शिवाजी पूल, दसरा चौक, लिशा हॉटेल चौक, सदर बझार, ताराराणी पुतळा, महावीर कॉलेज चौक, मध्यवर्ती बसस्थानक, सायबर चौक, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, गंगावेश, सायबर चौक, जवाहरनगर, फुलेवाडी नाका, कळंबा नाका, वाशी नाका, आर. के. नगर आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवत प्रत्येक व्यक्तीची, वाहन, साहित्याची तपासणी केली.
वाहनांतील गॅसकिटच्या तपासणीसह परवाना, वाहनांची कागदपत्रे,तसेच ब्रेथ अॅनालायझर यंत्राद्वारे वाहनचालकांची तपासणी केली. झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट, ‘दादा’,‘मामा’, ‘आई’, ‘पाटील’, यासह अन्य फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून वावरणाºया वाहनचालकांवर कठोर कारवाई केली. मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी पोलीस अधीक्षक मोहिते रस्त्यांवर उतरले होते. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, अशोक धुमाळ, संजय मोरे, अनिल गुजर, सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी स्वत: रस्त्यांवर उभे राहून वाहनांची तपासणी केली.
सीटबेल्ट व हेल्मेटचे प्रबोधन
वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे अपघातात होणाºया मृत्यूंची संख्या वाढत आहे. अनेकांना शारीरिक अपंगत्व आले आहे. अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी वेळोवेळी पोलीस दलाच्यावतीने प्रबोधन केले जात आहे. दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नसल्याने होणाºया अपघातांमध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत होऊन मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी वाहनधारकांना सीटबेल्ट व हेल्मेट सक्तीच्या सूचना पोलिसांनी यावेळी दिल्या.
वाहनचालकांनी वाहन चालविताना विहीत नमुन्यातील मापदंडांप्रमाणे वाहनांची नंबरप्लेट बसवावी. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नये, सोबत योग्य ती कागदपत्रे बाळगावीत व कायदेशीर कारवाई टाळावी.
- अशोक धुमाळ, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा