जिल्ह्यात दोन हजार वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:25 AM2021-04-22T04:25:45+5:302021-04-22T04:25:45+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी पुकारलेल्या संचारबंदीत पोलिसांनी बुधवारी दिवसभरात सुमारे दोन हजार वाहनांवर कारवाई करत दोन लाख ...
कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी पुकारलेल्या संचारबंदीत पोलिसांनी बुधवारी दिवसभरात सुमारे दोन हजार वाहनांवर कारवाई करत दोन लाख २१ हजार ८०० रुपये दंड वसूल केला. तर यापैकी १७८ वाहनांवर जप्तीची कारवाई केली.
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना, ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाने संचारबंदी पुकारली आहे. त्यामध्ये बुधवारी दिवसभरात सुमारे १,७१९ वाहनांकडून २ लाख २१ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १७८ वाहनांवर जप्तीची नामुष्की ओढवली. ही जप्त केलेली वाहने कोरोना काळ संपल्यानंतर दंड भरुन परत देण्यात येणार आहेत. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्या ३८० जणांकडून ८९ हजार ८०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
आस्थापनांवर कारवाई
सकाळी ११ वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश असताना, त्यावेळेनंतरही आस्थापना सुरु ठेवून पार्सल देत असल्याचे निदर्शनास आल्याने जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी धनराज बिअरबार (संभाजीनगर), रविराज बिअर शॉपी (मिरजकर तिकटी), मारुती ट्रेडर्स (संभाजीनगर) यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड केला. जुना राजवाडा पोलिसांनी पेट्रोलिंग करताना महापालिकेच्या पथकाला बोलावून ही कारवाई केली.