पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई
By Admin | Published: March 9, 2016 10:59 PM2016-03-09T22:59:57+5:302016-03-09T23:00:33+5:30
२७ हजारांचा दंड : नाशिकरोड मनपाची मोहीम
नाशिकरोड : परिसरात पाण्याचा अपव्यय करणाऱ्या १४१ जणांना मनपा विभागीय कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून, ५४ जणांकडून २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना रहिवाशांकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय केला जातो. पाण्याची टाकी भरून वाहणे, अंगणात सडा मारणे, पाईप लावून गाडी धुणे, नळातून जादा पाणी खेचण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार लावणे आदि पद्धतीने पाण्याची नासाडी केली जात आहे. नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालय पाणीपुरवठा, घरपट्टी, पाणीपट्टी या तीनही विभागांचे दहा जणांचे पथक गेल्या दहा दिवसांपासून नाशिकरोड परिसरात तपासणी मोहीम राबवित आहे. या तपासणीमध्ये पाण्याची विविध प्रकारे नासाडी करणाऱ्या एकूण १४१ जणांना नोटिसा बजाविण्यात आल्या तर २२ इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या होत्या. तीन दिवसांत आर्थिक दंड न भरल्यास कायमस्वरूपी पाणी कनेक्शन बंद करण्यात येणार होते. या पार्श्वभूमीवर नोटिसा दिलेल्यांपैकी ५४ जणांनी एकूण २७ हजार रुपये दंड भरला आहे. दंड भरल्यानंतर पुन्हा इलेक्ट्रिक मोटारीचा वापर करणार नाही, असे लेखी लिहून दिल्यानंतर काही मोटारी पुन्हा देण्यात आल्या. मनपा प्रशासनाकडून पाण्याच्या नासाडीबाबत सर्व स्तरांवर कठोर मोहीम राबविण्याची गरज आहे. वास्तविक फार मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र जागोजागी बघायला मिळत आहे.