जांभळेंसह सात नगरसेवकांवर कारवाई होणार : मुश्रीफ
By admin | Published: March 18, 2017 12:27 AM2017-03-18T00:27:18+5:302017-03-18T00:27:18+5:30
कारंडे-जांभळे वाद मिटविण्यासाठी प्रयत्न होता
\इचलकरंजी : येथील नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून येऊन नंतर पक्षाचा आदेश डावलत विरोधकांबरोबर हातमिळवणी करणाऱ्या अशोक जांभळे यांच्यासह सातही नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार सध्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू असून, त्यांच्यावर कारवाई होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.
इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीवेळी अशोक जांभळे व मदन कारंडे यांच्या सांगण्यावरून आपण प्रकाश आवाडे यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानुसार कारंडे यांना १८, तर जांभळे यांना ८ जागा कॉँग्रेसकडून मिळवून दिल्या. निवडणूक निकाल लागल्यानंतर नगराध्यक्ष भाजप पक्षाचा निवडून आला असला तरी नगरपालिकेचे बहुमत आम्हाला मिळाले होते. त्या बहुमताच्या जोरावर उपनगराध्यक्षांसह सर्व समित्यांचे सभापती, सदस्य याठिकाणी कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शाहू आघाडीच्या नगरसेवकांना संधी देता आली असती. जांभळे यांच्या मागणीनुसार त्यांना बांधकाम खाते देण्याबाबतही चर्चा झाली होती. असे असतानाही जनतेने दिलेला कौल व अन्य सर्वांचा विश्वास मोडून जांभळे यांनी आपल्यासोबत निवडून आलेल्या कलावती जांभळे, नितीन जांभळे, लतिफ गैबान, मंगल मुसळे-कोदले, शोभा कांबळे व तानाजी हराळे यांना घेऊन विरोधकांशी हातमिळवणी केली. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतर बंदीअंतर्गत कारवाई व्हावी, अशा सूचना पक्षाच्या वरिष्ठांकडून आल्या. (वार्ताहर)
कारंडे-जांभळे वाद मिटविण्यासाठी प्रयत्न होता
राष्ट्रवादीतील गटबाजीबाबत आपणाला माहिती मिळाल्यानंतर कारंडे-जांभळे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी आपण प्रयत्न केले होते. मात्र, त्यात आपणास अपयश आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.