दहशत माजवणारे स्टेटस ठेवताय..? तुमच्यावर असेल 'सोशल मीडिया मॉन्टेरिंग सेल'ची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 01:23 PM2021-12-18T13:23:37+5:302021-12-18T13:30:52+5:30
अशा प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी 'सोशल मीडिया माॅन्टेरिंग सेल' कार्यरत आहे. आतापर्यंत असे १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोल्हापूर : मोबाईल स्टेटसवर तलवार, खोटी शस्त्रे दाखवून फिर्यादी किंवा साक्षीदारांवर दबाव टाकून धमकी देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी सोशल मीडिया माॅन्टेरिंग सेल कार्यरत आहे. आतापर्यंत असे १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा संशयितांची गय केली जाणार नाही. असा इशारा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी दिला.
पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, सोशल मीडियाच्या माध्यमातून व मोबाईल संचावर स्टेटसच्या नावाखाली तलवारीने केक कापणे, तलवारीसारखे हत्याऱ्यांसोबत छायाचित्र लावणे, खोट्या किंवा खऱ्या पिस्तुलातून फायरींग करणे आदी प्रकारची छायाचित्रे किंवा चित्रीकरण स्टेट्स म्हणून लावून दहशत माजविण्या प्रकारची प्रवृत्ती बळावू लागली आहे.
यावर निर्बंध घालण्यासाठी २४ तास पोलीस दलाचे सोशल मीडिया माॅन्टेरिंग सेल कार्यरत आहे. यावर एखाद्या खटल्यातील फिर्यादी किंवा साक्षीदारावर असे दबाव टाकण्याचे षडयंत्र आढळून आल्यास अशा संशयिताविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे. आतापर्यंत अशा प्रकारचे १८ गुन्हे दाखल करून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई केली आहे. यात १५ दिवसांची जेल व अन्य शिक्षाही संशयितांना झाल्या आहेत.
नंबरप्लेटसह सायलेन्सर नसलेल्या वाहनांवर कारवाई
येत्या सोमवार (दि. २०) पासून शहर वाहतूक शाखा व पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमार्फत सायलेन्सर काढून फिरणारी वाहने, फॅन्सी नंबरप्लेट किंवा नंबरप्लेटच नसणे अशा वाहनधारकांवर कारवाई सुरु केली जाणार आहे.
३१ डिसेंबरसाठी पुन्हा ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह सुरु करणार
१८ ते ३१ डिसेंबर दरम्यान मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांवर तपासणी करून कारवाई केली जाणार आहे. यासाठी ब्रेथ ॲनालायझरला परवानगी मागण्यात आली आहे. कोरोना संसर्गानंतर ब्रेथ ॲनालयाझरचा वापर बंद करण्यात आला होता. आता पुन्हा पुढील नोझल युज ॲन्ड थ्रो सारखे वापरून वाहनधारकांची तपासणी केली जाणार आहे. यासाठी शहरासह जिल्ह्यातील ९ नाक्यांवर तपासणी सुरु केली जाणार आहे.