दुकाने उघडल्यास कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:17 AM2021-06-23T04:17:19+5:302021-06-23T04:17:19+5:30
कुरुंदवाड : लॉकडाऊनमुळे गेली काही महिने अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर दुकाने अद्यापही बंद आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत ...
कुरुंदवाड : लॉकडाऊनमुळे गेली काही महिने अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर दुकाने अद्यापही बंद आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. दुकाने सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे वारंवार परवानगी मागूनही दिली जात नाही. त्यामुळे आज बुधवारपासून प्रशासनाची परवानगी न घेता फिजिकल डिस्टन्सिंग राखत दुकाने सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदन शहर व्यापारी असोशिएशनच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी निखिल जाधव यांना दिले.
त्यामुळे मुख्याधिकारी जाधव याबाबत कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता होती. सायंकाळी पालिका सभागृहात पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे यांनी व्यापारी असोशिएशनची बैठक घेऊन शासनाच्या नियमांचे उल्लंघन करुन दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही, हे स्पष्ट केले.
मुख्याधिकारी जाधव पालिका कार्यक्षेत्रात कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाच्या लॉकडाऊन नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याने शहरातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. मात्र आर्थिककोंडीतून दुकाने सुरू करण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतल्याने मुख्याधिकारी जाधव यांच्या भूमिकेकडे व्यापारी असोशिएशनसह शहराचे लक्ष लागून होते.
मात्र, सायंकाळी पोलीस उपअधीक्षक वैजणे यांनी व्यापा-यांची पालिका सभागृहात बैठक घेऊन अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त शासन आदेश मिळेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही. व्यापा-यांना परवानगी हवी असेल तर जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी, असा सल्ला दिल्याने व्यापा-यांना शासन आदेशाचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.