शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिकांमधील चुका प्रकरणी दहा दिवसांत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:53 AM2020-02-18T11:53:46+5:302020-02-18T11:55:41+5:30
शिष्यवृत्तीची प्रश्नपत्रिका तयार करताना की त्याची छपाई करताना चूक झाली आहे, ते शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त केली जाईल. या समितीने चौकशी करून दिलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल. दहा दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे राज्य परीक्षा परिषदेच्या सहाय्यक आयुक्त स्मिता गौड यांनी सांगितले.
कोल्हापूर : शिष्यवृत्तीची प्रश्नपत्रिका तयार करताना की त्याची छपाई करताना चूक झाली आहे, ते शोधण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त केली जाईल. या समितीने चौकशी करून दिलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल. दहा दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे राज्य परीक्षा परिषदेच्या सहाय्यक आयुक्त स्मिता गौड यांनी सांगितले.
‘पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत चुकाच चुका’ हे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात प्रसिद्ध केले. परीक्षेतील या चुकांबाबत राज्य परीक्षा परिषद पुढे काय कारवाई करणार याबाबत सहाय्यक आयुक्त स्मिता गौड यांनी सांगितले की, तज्ज्ञांद्वारे (प्राशनिक) प्रश्नपत्रिका तयार करून ती समीक्षकांकडून तपासली जाते. त्यात काही त्रुटी असल्यास त्यांची त्याच ठिकाणी समीक्षकांकडून दुरुस्ती केली जाते. त्यांच्याकडून मिळालेली पाकीटबंद प्रश्नपत्रिका पुढे छपाईसाठी पाठविली जाते.
रविवारी झालेल्या परीक्षेतील पाचवीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये चुका झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याबाबत चौकशी करण्यासाठी माध्यम आणि विषयनिहाय प्रत्येकी दोन तज्ज्ञ सदस्यांची समिती नियुक्त केली जाईल. प्रश्नपत्रिका करणारे तज्ज्ञ, समीक्षकांकडे आणि छपाई करणाऱ्यांची चौकशी करून संंबंधित समिती परीक्षा परिषदेला अहवाल सादर करेल. त्यात चुका नेमक्या कोणत्या पातळीवर झाल्या आहेत, त्याचा शोध घेतला जाईल.
अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. प्रश्नांमध्ये चूक असल्यास तो रद्द करून त्याचे गुण विद्यार्थ्यांना दिले जातील. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
अन्य माध्यमांतील प्रश्नपत्रिकांची तपासणी
इयत्ता पाचवी आणि आठवीच्या प्रत्येकी चार विषयांच्या मराठीसह ऊर्दू, हिंदी, कन्नड अशा विविध १५ माध्यमांमध्ये प्रश्नपत्रिका काढण्यात येतात. हे विषय आणि त्याच्या विविध माध्यमनिहाय दोन तज्ज्ञांची समिती नियुक्ती करण्यात येईल. ही समिती या माध्यमांच्या प्रश्नपत्रिकांची तपासणी करून अहवाल देईल, असे गौड यांनी सांगितले.
परीक्षा घेऊनच पेपर सेटर यांची निवड करा
शिष्यवृत्ती परीक्षेत झालेल्या चुका या परीक्षा परिषदेला भूषणावह नाही. पेपर सेट करणाऱ्यांना देखील परीक्षा घेऊन निवडले पाहिजे. यापुढे अशा चुका होणार नाहीत, याची दक्षता परिषदेने घ्यावी. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश वरक यांनी केली आहे.