सर्वाधिक रुग्णसंख्येचा विचार करून यंत्रणा सक्रिय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:22 AM2021-04-06T04:22:10+5:302021-04-06T04:22:10+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा वाढत्या संसर्गाशी सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्वाधिक रुग्णसंख्येचा विचार करून आरोग्यसेवा तयार ठेवाव्यात, कोल्हापूर महापालिकेने स्वतंत्र ...
कोल्हापूर : कोरोनाचा वाढत्या संसर्गाशी सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्वाधिक रुग्णसंख्येचा विचार करून आरोग्यसेवा तयार ठेवाव्यात, कोल्हापूर महापालिकेने स्वतंत्र बैठक घेऊन नियोजन करावे तसेच सीपीआरने पुन्हा एकदा यंत्रणा सक्रिय करावी, बंद असलेले व्हेंटिलेटर्स दुरुस्त करून घ्यावेत, अशा सूचना सोमवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केल्या.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे आदी उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, एप्रिलअखेर संभाव्य वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोविड काळजी केंद्र सुरू करावेत. खाटांची संख्या कमी पडणार नाही याबाबत तयारी ठेवावी. लक्षणे दिसताच तपासणीबाबत प्रबोधन करावे. विनामास्क नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करावी, कारखानदारांची बैठक घेऊन कामगारांच्या लसीकरण आणि आरटीपीसीआर तपासणीबाबत नियोजन करावे.
पालकमंत्री पाटील म्हणाले, सीपीआरमधील उपलब्ध खाटांच्या माहितीसाठी देण्यात आलेले मोबाइल रिचार्ज करून पुन्हा सक्रिय करावेत. प्रत्येक तालुक्यात कोविड काळजी केंद्राची तयारी ठेवावी. जिल्ह्यात रेमडेसिवीरचा साठा ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपली जबाबदारी पार पाडावी. महापालिका हद्दीत रिक्षा फिरवून जनजागृती करावी. खाटांची संख्या, उपचार घेणारे रुग्ण याबाबत स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून नियंत्रण ठेवावे. पोलीस विभागाने गृहरक्षक दल मागणीबाबत प्रस्ताव पाठवावा.
मंत्री यड्रावकर म्हणाले, सीपीआरमध्ये उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात. येथे खाटांची कमतरता भासणार नाही याबाबत योग्य नियोजन करावे. बंद व्हेंटिलेटर्स तात्काळ दुरुस्त करून घ्यावेत.
जिल्हाधिकारी देसाई यांनी प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे कोविड काळजी केंद्र सुरू करण्यात आली असून सद्य:स्थितीत आणि संभाव्य रुग्णसंख्या गृहीत धरून नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
--
उपलब्ध खाट : २ हजार ५३९
खासगी : ६५२, शासकीय : १ हजार ८८७
ऑक्सिजन नसलेले बेड : १ हजार ४१७
ऑक्सिजन बेड : ९९०
आयसीयू : २२७
व्हेंटिलेटर्स -२०२
रक्ताची उपलब्धता : १ हजार ५०० बॅग
ऑक्सिजनची उपलब्धता- ५० मेट्रिक टन
लसीकरण-
पहिला डोस- ३ लाख ६१ हजार ६६८ पूर्ण
दुसरा डोस- २६ हजार २६८ पूर्ण
एप्रिलअखेर १५ लाख जणांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन.
----
१५ टक्के रुग्ण मुंबई-पुण्याचे
सध्याच्या कोरोना रुग्णांमध्ये १५ टक्के रुग्ण हे मुंबई-पुण्याहून परतलेले नागरिक आहेत. शिवाय उपचारासाठी येणाऱ्यांमध्ये सांगली, सातारा, कोकण, कर्नाटक अशा अन्य जिल्ह्यातील रुग्णांची संख्याही मोठी आहे. या जिल्ह्यांनी रुग्णांना आरोग्यसेवा द्याव्यात, असे झाल्यास कोल्हापूरवर अतिरिक्त ताण पडणार नाही.
---
होम आयसोलेशनला प्राधान्य
पालकमंत्री पाटील म्हणाले, मागच्या वेळी सगळ्या रुग्णांना दवाखान्यातच भरती केल्याने बेडची संख्या अपुरी पडली. यंदा मात्र घरी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांचे होम आयसोलेशन केले जाईल. त्यामुळे गरजू रुग्णांसाठी बेड उपलब्ध राहतील.
--
फाेटो नं ०५०४२०२१-कोल-कोरोना आढावा बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.
--