कार्यकर्त्याची अधिकाऱ्यांना दादागिरी, कोल्हापूर महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 05:25 PM2023-01-04T17:25:33+5:302023-01-04T17:25:56+5:30
एकेरी भाषेत शिवीगाळ करत ‘तुला बघतोच थांब’ अशा शब्दातही कार्यकर्त्याने अधिकाऱ्याला दरडावले
कोल्हापूर : विनामोबदला समाजसेवा करत असल्याच्या आविर्भावात विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम करणाऱ्या एक कार्यकर्त्याच्या अरेरावीमुळे महानगरपालिकेचे अधिकारी हादरून गेले आहेत. या कार्यकर्त्याच्या जाचाला तसेच त्याच्याकडून होणाऱ्या अरेरावीला कंटाळून महापालिकेतील ठोक मानधनावर काम करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांनी आपली नोकरी सोडली आहे.
पाच-सहा दिवसांपूर्वी महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याचा याच कार्यकर्त्याने कोल्हापुरी अश्लील भाषेत उद्धार केल्याचा प्रकार घडला, त्यानंतर या कार्यकर्त्याचे कारनामे ऐकायला मिळू लागले आहेत. बाहेरगावाहून आलेले अधिकारी घाबरून गेले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत आणि कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर भाग घेऊ, अशी भूमिका घेतल्याने अधिकाऱ्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे’ विहीर झाली आहे.
पाच-सहा दिवसांपूर्वी या कार्यकर्त्याला मीटिंग रद्द झाल्याचे सांगायला विसरून गेल्यामुळे अधिकाऱ्याला त्याच्या शिव्या खाव्या लागल्या. निरोप देण्याचे हे निमित्त झाले असले तरी यापूर्वी या अधिकाऱ्याने त्याचे म्हणणे ऐकून न घेतल्याचा राग त्याने काढल्याचे सांगितले जाते. हा अधिकारी एकदा नाही दहा वेळा ‘साहेब माझे ऐकून तरी घ्या’ असे सांगत असताना त्याला एकेरी भाषेत शिवीगाळ केली. ‘तुला बघतोच थांब’ अशा शब्दातही कार्यकर्त्याने अधिकाऱ्याला दरडावले आहे. सुमारे वीस मिनिटे या अधिकाऱ्याला शिव्या घालण्यात कार्यकर्त्याने धन्यता मानली आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाकडे सहायक बागा अधीक्षक हे पद ठोक मानधनावर भरले जाते; पण याच सहायक बागा अधीक्षकांना सर्वाधिक त्रास या कार्यकर्त्याने दिला आहे. आतापर्यंत तीन सहायक बागा अधीक्षक त्याच्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडून गेले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर ऊठबस आणि शासन नियुक्त समितीवर सदस्य असल्याने आपली बाजू कोणी घेणार नाही या एकाच नैराश्येतून त्यांनी नोकऱ्या सोडल्या आहेत.
सध्याच्या दोन सहायक अधीक्षकांना मी सांगतो म्हणून कामावरून कमी करा, असा आग्रह कार्यकर्त्याने धरला आहे. परंतु त्याच्या आग्रहाकडे फारसे कोणी लक्ष दिलेले नाही. त्यामुळेच कार्यकर्त्याची आगपाखड झाली असल्याची चर्चा आहे.