कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपक्रमांना उद्योजक, बॅँकांचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 06:20 PM2017-08-06T18:20:55+5:302017-08-06T18:21:03+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या समाजोपयोगी उपक्रमांना सढळ हस्ते सहकार्य करण्याचा निर्णय जिल्ह्यातील विविध बॅँका आणि उद्योजकांनी घेतला आहे. शनिवारी (दि. ५) जिल्हा परिषदेत झालेल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या समाजोपयोगी उपक्रमांना सढळ हस्ते सहकार्य करण्याचा निर्णय जिल्ह्यातील विविध बॅँका आणि उद्योजकांनी घेतला आहे. शनिवारी (दि. ५) जिल्हा परिषदेत झालेल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.
जिल्हा परिषदेच्या वतीने बाराही तालुक्यांत विविध सेवा पुरविल्या जातात. मात्र वाढती लोकसंख्या, वाढते पशुधन, खासगी संस्थांची स्पर्धा, रिक्त असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांच्या जागा आणि अपेक्षेपेक्षा कमी मिळणारा निधी यांमुळे जिल्हा परिषदेसमोर असे उपक्रम समर्थपणे राबविण्याचे आव्हान आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील विविध उद्योजक आणि बॅँकांना सहकार्यासाठी आवाहन करण्यात आले. आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्हा परिषदेच्या उपक्रमांना सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी व्यक्त केली.
शौमिका महाडिक म्हणाल्या, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता या त्रिसूत्रीला जिल्हा परिषदेने महत्त्व दिले आहे. यासाठीच्या आखलेल्या उपक्रमांना उद्योजक आणि बॅँकांनी सहकार्य करावे आणि सामाजिक दायित्व निभवावे.जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा चांगला असून जिल्ह्यातील २० शाळांना इंडो काउंटच्या माध्यमातून सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी इंडो काउंट फाउंडेशनचे श्री. देशपांडे यांनी दिली.
शिंगणापूर येथील क्रीडा प्रशालेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची जबाबदारी घाटगे पाटील इंडस्ट्रीजचे गिरीश श्रीखंडे, कॅनरा बॅँक आणि आयसीआयसीआय बॅँक, ठेकेदार विजय भिके यांनी स्वीकारली. डिजिटल ग्रामनिर्मितीसाठी आयसीआयसीआय बॅँक सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले. पशुसंवर्धन विभागाला व्हॅन देण्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली.
समाजाच्या दातृत्वावर विश्वास व्यक्त करतानाच जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी ‘गोकुळ’चे एम. पी. पाटील, एएमपी सॉफ्ट आयटीचे ए. एम. पाटील, जिल्हा परिषद कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष एम. जी. पाटील, युनायटेड बॅँकेच्या स्वाती पाटील, पंजाब नॅशनल बॅँकेचे रणजित पाटील, सेंट्रल बॅँकेचे श्रावण गुप्ता, आंध्रा बॅँकेचे बी. एस. कांबळे, जिल्हा बॅँकेचे एम. के. भोसले, कॉर्पोरेट बॅँकेचे आर. आर. सपाटे, भीष्म इस्टिट्यूटचे डॉ. भीष्म पाटील उपस्थित होते.